हृदयद्रावक..! दोन चिमुकल्यांना विष पाजून इंजिनिअर तरुण आणि पत्नीने संपवलं जीवन, पोलिसांनी सांगितलं कारण
बेंगळुरूच्या सदाशिवनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. बेंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनीअर अनुप कुमार आणि त्याची पत्नी राखी यांनी दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली आणि नंतर या दाम्पत्याने आत्महत्या केली.
मूळचे यूपीतील प्रयागराज येथील रहिवासी असलेल्या या कुटुंबातील चौघांचे मृतदेह सोमवारी सकाळी बेंगळुरू येथील घरात आढळले. अनुप कुमार (३८) हा बेंगळुरू येथील एका आयटी कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरीला होता. त्यांच्यासोबत पत्नी राखी (३५), अनुप्रिया (५) आणि प्रियांश (२) ही दोन मुले होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप आणि राखी यांनी आधी दोन्ही मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. पोलीस सध्या हत्या आणि आत्महत्येच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.
स्थानिक कंपनीत सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या अनुप कुमार यांच्या घरी सकाळच्या सुमारास मोलकरीण पोहोचली तेव्हा गेट उघडले गेले नाही. तिने अनेकदा हाका मारून व गेट वाजवून पाहिले मात्र घरातून काहीच प्रतिसाद आला नाही. मोलकरणीला याबाबत संशय आल्याने तिने शेजाऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतील दृष्य पाहून सर्वांना धक्का बसला. अनुप कुमार, त्यांची पत्नी आणि मुलांचे मृतदेह खोलीत पडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप आणि राखी यांनी मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली होती. त्यानंतरही दोघांनीही विष घेऊन जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या तब्येतीमुळे हे कुटुंब त्रस्त होते. यामुळेच त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
घरातील मोलकरणीने दिलेल्या माहितीनुसार, अनुप कुमार आणि राखीची मुलगी अनुप्रिया ही एक दिव्यांग मुलगी होती. यामुळे दोघेही अस्वस्थ आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत होते. मात्र, ते असे पाऊल उचलतील, याची कोणीच कल्पना केली नव्हती. कुटूंबाने पुद्दुचेरीला जाण्याचाही बेत आखला होता. मोलकरणीच्या जबाबानुसार, पोलिसांनी सांगितले की, सहलीला जाण्यासाठी त्यांनी रविवारी पॅकिंगही केले होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे सांगितले जाते. त्यांनी दोन स्वयंपाकी आणि घरकामासाठी तसेच मुलांची काळजी घेण्यासाठी एका महिलेची नेमणूक केली होती. ते तिघांना दरमहा १५-१५ हजार रुपये पगार देत असत. सध्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.