सामान्य नागरिकाचं एखादं काम करण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयात कर्मचारी, अधिकारी अडवणूक करतात. नागरिकांकडून पैसे घेऊन ते काम लगेच करून देतात. आता अशाच एका खाबुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला वैतागून नागरिकांनी चक्क नोटांचा पाऊस पाडल्याचा प्रकार घडलाय.
सतत लाच मागत असल्यानं नाराज होऊन ग्रामस्थांनी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन नोटा उधळल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दोन मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गुजरातमधला हा व्हिडीओ आहे. गुजरातच्या कोणत्या भागातला हा व्हिडीओ आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र यात नागरिक रागात दिसत असून त्यांनी जो पवित्रा घेतला त्यामुळे अधिकारी गोंधळला. अधिकारी हातही जोडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की कार्यालयात मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष आहेत. सगळे मिळून अधिकाऱ्यांवर नोटा उधळत आहेत. अधिकाऱ्याच्या अंगावर, टेबलावर आणि कार्यालयात नोटाच नोटा पसरल्या आहेत. ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा ढीग लागला आहे. यावेळी पैसे उधळणारे घ्या आणखी पैसे घ्या असं म्हणताना दिसतायत. सोसायटीत पाणी येत नसल्याची तक्रार या नागरिकांची आहे. पाणी पूर्ववत करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप असून यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. आता याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.