सिल्लोड : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील विविध कागदपत्रांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी दुपारी २ वाजता ४५ मिनिटे तपासणी केली. त्यानंतर प्रशासनाने ४ हजार ७३५
बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला. सिल्लोड
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी १ वाजता भाजपाचे माजी
खा. किरीट सोमय्या आले व तडक ते उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या
कक्षात दाखल झाले. त्यानंतर पठाण यांच्या बाजूला व्हीआयपींसाठी ठेवलेल्या
विशेष खुर्चीत बसून त्यांनी तासभर त्यांच्या समोर बसलेले तहसीलदार संजय
भोसले व बाजूला बसलेले पठाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पठाण
यांना जन्म नोंदणी प्रमाणपत्रांच्या फाईल दाखवण्यास सांगितले.
त्यामुळे पठाण यांंनी त्यांच्यासमोर जन्म नोंदणी प्रमाणपत्रांचा गठ्ठा ठेवला. सोमय्या यांनी जवळपास ४५ मिनिटे सर्व फायली चाळल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासनावर कसलीच चौकशी न करता ४ हजार ७३५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला. तेथून ते दुपारी ३ वाजता नगरपरिषद कार्यालयात गेले. तेथे मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर हे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी ५ मिनिटे उपमुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस प्रमाणपत्र कसे काय दिले? असा प्रश्न केला. त्यावर उपमुख्याधिकाऱ्यांनी त्यांना मुख्याधिकारी साहेबांशी चर्चा करून माहिती द्यावी. मी नवीन आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर सोमय्या तेथून निघून गेले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
परवानगी नसताना फायली तपासल्याच कशा?
किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी पठाण यांना सिल्लोड येथे २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता येणार आहे, असे पत्र १९ जानेवारी रोजी दिले होते. मात्र, पठाण यांनी त्यांच्यासमोर विविध फायलींचा गठ्ठाच ठेवला. त्यानंतर सोमय्या यांनी सर्व कागदपत्रे तपासली. हे प्रमाणपत्रे कोणत्या अधिकाराने तपासली? आणि पठाण यांनीही शासकीय कागदपत्रे त्यांंना कशी दिली? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.सौजन्य : लोकमत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.