बाळाची उलटी आईलाच करायला लावली साफ; उंब्रज आरोग्य केंद्रात सफाई कर्मचाऱ्यांचा प्रताप, अमानुष कृत्यामुळे संताप
इंदोली : उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी उपचारासाठी आलेल्या एका चार महिन्यांच्या बाळाला उलटी झाली.
ती उलटी त्या बाळाच्या आजारी आईलाच साफ करायला लावल्याचा प्रकार घडला. त्याबाबत अन्य रुग्णांनी संताप व्यक्त केला. काल सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती अशी, जालना भागातील ऊसतोड मजूर असलेली ही महिला आपल्या चार महिन्यांच्या बाळासह उपचारासाठी रुग्णालयात आली होती. गर्दीमुळे तिने ब्लडप्रेशर तपासणीसाठी जातेवेळी आपल्या बाळाला दुसऱ्या महिलेकडे सोपवले.
यावेळी आईच्या जवळ नसल्याने रडत असताना बाळाला उलटी झाली. या घटनेनंतर रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी त्या महिलेवरती आपला संताप व्यक्त करत त्या महिलेलाच ही उलटी साफ करायला लावली. या अमानुष कृत्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी आलेले सर्व रुग्ण स्तब्ध झाले. या घटनेनंतर अनेक रुग्णांनी दवाखान्यात अनेक आजारांचा औषध साठा उपलब्ध नसल्याचा, कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीचा व डॉक्टर वेळेत येत नसल्याचा सूर धरला. त्याचबरोबर गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील रुग्णांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.