छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनीत १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ बुधवारीदेखील कायम राहिले. कराटे, ज्युडोत प्रभुत्व असलेला प्रदीप ब्लॅक बेल्ट चॅम्पियन होता. तरीही त्याच्या झालेल्या क्रूर हत्येने
आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रदीप सहा महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी
शहरात आला होता. त्याचे वडील शेती व्यवसाय करतात. दशमेश नगरातील खोली सोडून
तो दहा दिवसांपूर्वीच उस्मानपुऱ्यातील म्हाडाच्या जुन्या अपार्टमेंटच्या
तळमजल्यावरील तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहण्यास आला होता.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता एक मित्र रिडिंग रूम, दोन मित्र संक्रांतीनिमित्त नातेवाईकाकडे तर एक पतंग उडवण्यासाठी गेला होता. ते सर्व रात्री ९:३० वाजता खोलीवर परतले. १०:३० वाजता जेवणाची वेळ झाल्याने प्रदीपला आवाज देत त्याच्या अंगावरील पांघरूण काढल्यावर प्रदीप मृतावस्थेत आढळला. सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांच्यासह जवळपास ४ पथके घटनेचा तपास करत आहेत.
तब्बल १७ वार
डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याच्या गळा, छाती, मान व डोक्यात एकूण १७ वार आहेत. सर्वाधिक खोल वार डोक्यात तर एक पाठीत आहे. हे सर्व वार एकाच शस्त्राने झाल्याचा अंदाजही डॉक्टरांनी व्यक्त केला.
कराटेत ब्लॅक बेल्ट
- अंगकाठीने बारीक मध्यम बांध्याचा, शांत स्वभावाच्या प्रदीपला कराटे, ज्युडोची आवड होती. त्याने त्यात सर्वोच्च स्तर समजल्या जाणाऱ्या ब्लॅक बेल्टपर्यंत मजल मारली होती.
- त्यामुळे त्याच्यावर सहजासहजी वार करणे अशक्य होते. प्रदीप बेडरूममध्ये झोपलेला असावा. घराचा दरवाजा उघडाच असल्याने मारेकऱ्याने प्रवेश करून त्याच अवस्थेत गळ्यावर वार केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांच्या संशयाचे हे आहेत मुद्दे
- प्रदीपचे अन्य चार रूम पार्टनरसह जवळपास २० मित्रांची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. यात प्रामुख्याने शनिवारचा महाविद्यालयातला वाद, अन्य मित्र, मैत्रिणींसोबतच्या वैयक्तिक वादाच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.- मारेकऱ्याने प्रदीपचा मोबाईल सोबत नेला. ६:५५ वाजता तो बंद झाला आहे. मारेकऱ्याने मोबाईल का नेला, हे अद्यापही अनुत्तरीत आहे. त्यामुळे एखाद्या नशेखोर, लुटमारीच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.