Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय पाटील यांची भाजपात घरवापसी?

संजय पाटील यांची भाजपात घरवापसी?
 

तासगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत विधानसभा निवडणुकीत उतरलेले माजी खासदार संजय पाटील यांना पराभवानंतर भाजपात परतीचे वेध लागल्याची जोरदार चर्चा आहे. मतदारसंघात खास करून त्यांच्या समर्थकांत ही चर्चा आहे. यासाठी त्यांनी तीन ते चार वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अशातच भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानात संजय पाटील यांच्या कट्टर समर्थकांनी खुलेआम सहभाग घेतला. परिणामी संजय पाटील आता अजितदादांना बाय बाय करणार, अशा चर्चा आहेत.

 

संजय पाटील 2014 व 2019 असे दोनदा भाजपमधून खासदार झाले. 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. पक्षांतर्गत कुरघोड्या जिल्हाध्यक्षापासून अनेक आमदार, नामदारांना संजय पाटील यांनी दहा वर्षांच्या काळात शिंगावर घेतले होते. पक्षांतर्गत अनेकांबरोबर त्यांचे वितुष्ट होते. त्यामुळे त्यांचा लाखाच्या फरकाने पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच पुन्हा शड्डू ठोकला. ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित यांच्याशी त्यांची लढत झाली. सलग तीनवेळा लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भाजपाला सोडचिठ्ठी देत संजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. पण तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची, तर रोहित पाटलांसाठी ती प्रतिष्ठेची होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अजित पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे संजय पाटील व कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपचे वेध लागले आहेत. संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर भाजपमध्ये आहेत. 

तासगाव - कवठेमहांकाळचे ते निवडणूक प्रमुख आहेत. भाजपची सध्या सदस्य नोंदणी सुरू आहे. सुरुवातीच्या काळात प्रभाकर पाटील अथवा त्यांचे कार्यकर्ते कुठेही सदस्य नोंदणीमध्ये नव्हते, मात्र नंतर भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते सदस्य नोंदणी करू लागले. मग प्रभाकर पाटील व कार्यकर्ते सक्रिय झाले. संजय पाटील राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय नियमाप्रमाणे राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांचा चिरंजीव भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या राजकारणात कार्यकर्त्यांची अवस्था मात्र 'कोणता झेंडा घेऊ हाती' अशी झाली आहे.


अजित पवार यांचा फोटो गायब

संजय पाटील यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या प्रसिद्धीतून अजित पवार यांचे फोटो गायब झाले होते. त्यामुळे संजय पाटीलही अनेक दिवसांपासून द्विधा स्थितीत असल्याचे स्पष्ट दिसते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.