महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून एक महिना झाला. मात्र या मंत्रिमंडळात जे सहभागी झाले त्यापेक्षा चर्चा झाली ती नाराजांची. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. तसंच छगन भुजबळ यांनीही त्यांची नाराजी
बोलून दाखवली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचं
सांगितलं होतं, त्यांना तिकिट दिलं गेलं पण त्यांचा पराभव झाला. या
कारणामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डावललं गेलं का? यासह इतर प्रश्नांची
उत्तरं दिली आहेत.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
“लोकसभा
लढण्याची माझी इच्छा नव्हती. पण मंत्रिपद मिळालं नाही यामागे निश्चित काय
कारण आहे हे मला माहिती नाही. दिल्लीत मंत्रिपद देताना काय विचार केला जातो
हे मला माहिती नाही. पक्षासाठी जर हे योग्य असेल तर ते स्वीकारावं लागेल.
मला अर्थमंत्री म्हणून संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. मी
प्रदेशाध्यक्ष असताना खडकवासला, अमरावती पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, भंडारा
गोंदिया जिल्हा परिषदा जिंकल्या. कदाचित दुसऱ्यांना संधी देण्यासाठी
पक्षाने विचार केला असेल. पण ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. आपल्यातील
उणिवा लक्षात येतात. कदाचित अजून काही संधी मिळाली तर तीही आनंदाने पार
पाडेन.” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
बलाढ्य बहुमत असलेल्या सरकारमध्ये मी का नाही हे माझ्यासाठीही कोडंच-मुनगंटीवार
बलाढ्य बहुमत असलेल्या सरकारमध्ये मी का नाही? हे कोडं मलाही सुटलेलं नाही. पण आता मला पुढचा विचार करायचा आहे. असे का झाले वगैरे प्रश्न विचारणं माझ्यासाठी कार्यकर्त्यासाठी योग्य नाही. हजारो फोन आले, शेकडो लोक भेटायला आले. आजही येत आहेत. लोकांचं प्रेम आहे हे दिसतं आहे. मंत्रिपद हे एकच लोकसेवेचं साधन आहे असं नाही. झोकून देऊन राष्ट्रकार्य करणे हा आमचा शिरस्ता आहे. शिस्तीचा संस्कार हे आमच्या पक्षाचे वेगळेपण आहे. माझ्यात जे गुण आहेत त्याचा आमचे नेते पक्षविस्तारासाठी नक्कीच उपयोग करुन घेतील असा मला विश्वास आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी सांभाळेन.
अर्थमंत्री असताना मी उत्तम काम केलं-मुनगंटीवार
मी जेव्हा राज्याचा अर्थमंत्री होतो तेव्हा जबाबदारी मोठी होती. २०१४ मध्ये माझ्याकडे ते पद होतं. दहा वर्षांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकाळानंतर माझ्याकडे ते पद आलं. ज्यानंतर बरीच आव्हानं होतं. पायाभूत सुविधांचं जाळं उभं करणं, अनुशेषग्रस्त भागाच्या व्यथा वेदना दूर करणं हे मी केलं असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ११ हजार ९७५ कोटींचा सरप्लस अर्थसंकल्प मी तेव्हा मांडला होता. त्यावेळी उत्तम अर्थमंत्री म्हणून माझा सत्कार करण्यात आला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘सरकारनामा’च्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही महत्त्वाचं विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला वगळलं का?
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तुमचं मंत्रिपद गेलं का? असं विचारलं असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की असं अजिबात झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस आणि माझे व्यक्तिगत संबंध हे राजकारणाच्या पलिकडचे आहेत. त्यामुळे त्यांनी मला वगळलं या चर्चांमध्ये खरोखर काहीही अर्थ नाही. मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मी महामंत्री केलं होतं. विनोद तावडे, रावसाहेब दानवेही कार्यकारिणीत होते. मला ते मंत्री करायला मागेपुढे कशाला पाहतील? मी मंत्री न होण्याचं कारण भलतंच आहे, ते मलाही माहीत नाही जाऊदे तो विषय.” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.