बीड :दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. परळीत वाल्मीक कराड याची आई पारूबाई आणि पत्नी आंदोलनाला बसल्या आहेत.
वाल्मीक कराड याच्या विरोधात फास आवळला जात असताना त्याच्या पत्नीचा संयम सुटत असल्याचे आज दिसून आले. परळीत माध्यमांशी बोलताना वाल्मीक कराडच्या पत्नीने आज अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राग व्यक्त केल्याच्या दिसून आले. 'तुम्हाला निवडून यायला मोठं, व्हायला अण्णा पाहिजे, आता त्याच अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का? तुम्ही नेहमी येत होतात आमच्या घरी,ते पण अनेकदा आले मग आज राजकारणासाठी अण्णाचा बळी तुम्ही का द्यायला निघालात! तुम्हाला काय राजकारण करायचे ते मुंबईत बसून करा' अशा शब्दात कराड याच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे. वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर एसआयटीने त्याचा ताबा घेतला आहे. बीड कारागृहात असलेल्या कराड याची प्रकृती बिघडल्याने त्याची पत्नी आणि आई पारूबाई यांनी वाल्मीक कराडला अडकवले जात आहे, असा आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. परळीत वाल्मीक कराड यांच्या पत्नीने आज थेट भाष्य करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
'तुम्ही सगळे आधी माझ्या घरी खेट्या घालायचात ना, तुम्ही पण येत होतात ना! निवडून यायला तुम्हाला अण्णा लागत होता, मोठा व्हायला अण्णा लागत होता मग आता राजकारण करायला अण्णा नको. माझ्या माणसाचं मरण का करता? तुम्हाला काय राजकारण करायचं ते मुंबईत बसून करा' अशा शब्दात कराड याच्या पत्नीने आपल्या मनातील खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली.परळी मध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक कराड याच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. काल वाल्मीक कराड याच्या मातोश्री पारूबाई आणि पत्नी यांच्यासह शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले होते. वाल्मीक कराड यांचा राजकारणासाठी बळी दिला जात असल्याचा आरोप करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे आमदार सुरेश धस हे राजकारण करत असल्याचा आरोप कराड याची आई आणि पत्नीने माध्यमांशी बोलताना केला होता.
आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत परळीत हे आंदोलन सुरू होते. मात्र वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर आंदोलकांचा संयम सुटत असल्याचे दिसून आले. आत्मदहनाचा प्रयत्न आणि टायर जाळत बसवर दगडफेकीच्या घटना काल घडल्या होत्या. आज वाल्मीक कराड यांच्या पत्नीने अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.काल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर कराड याच्या पत्नीने जातीयवाद करत असल्याचा आरोप केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.