डॅशिंग, खमक्या आणि कर्तबगार अधिकाऱ्याकडे संतोष देशमुख हत्येचा तपास, कोण आहेत बसवराज तेली?
मुंबई : अतिशय क्रूर आणि निर्घृणपणे मारलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून त्याची जबाबदारी खमके आणि डॅशिंग अधिकारी बसवराज तेली यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
त्यांच्या पथकात एकूण ९ अधिकारी कर्मचारी असतील. विशेष म्हणजे पथकातील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांना बीड पोलीस दलात सेवेचा अनुभव आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतील डॉ. बसवराज तेली (पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये काही अधिकारी आणि अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत आयपीएस अधिकारी बसवराज तेली?
बसवराज तेली हे मूळचे कर्नाटकचे... २०१० च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यातून आपल्या सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर पुण्यात उपायुक्त म्हणून काम केल्यानंतर वर्ध्यात त्यांनी जिल्हा अधीक्षक म्हणून काम पाहिले. नागपूरला पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांची बदली झाली. सध्या ते गुन्हे अन्वेषण विभागात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
अतिशय कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कडक शिस्तीचे आणि डॅशिंग अधिकारी असलेल्या तेली यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशीही ओळख राहिलेली आहे. त्यांच्याकडे बीडमधील देशमुख हत्याकांचा तपास आल्याने पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि बडे मासे जाळ्यात येतील, अशी अपेक्षा बीडवासीय बोलून दाखवत आहेत.
विशेष तपास पथकात कुणाकुणाचा समावेश?
आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (पोलीस उपमहानिरीक्षक) यांच्या अध्यक्षतेखालील पथकात अनुभवी अधिकारी अनिल गुजर (पोलीस उपअधीक्षक), महेश विघ्ने (पोलीस उपनिरीक्षक), आनंद शिंदे (पोलीस उपनिरीक्षक), विजयसिंग जोनवाल (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), तुळशीराम जगताप (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) मनोज वाघ (पोलीस हवालदार) चंद्रकांत काळकुटे (पोलीस नाईक) बाळासाहेब अहंकारे (पोलीस नाईक) आणि संतोष गित्ते (पोलीस शिपाई) यांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.