...तर सात पिढ्या लक्षात ठेवतील असा दणका देऊ!
पुणे: अवैध धंद्याद्वारे जे कोणी पैसे कमावत आहेत, त्यांना आमची सक्त ताकीद, सूचना आहे. गँग चालवून, दमदाटी करून खंडणी आणि इतर प्रकारच्या गोष्ट कोणी करत असेल किंवा बळाच्या जोरावर जमीन, घरे खाली करण्याची मनात शंका, इच्छा असेल तर त्यांनी शहर सोडून निघून जावे.
अन्यथा, आम्ही अशी कारवाई करू, की त्यांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये परिमंडळ पाचच्या वतीने विविध गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल पुनर्प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते.
या वेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉ. राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, अवैध धंद्यांचा बंदोबस्त हा आमचा प्राधान्याचा विषय आहे. त्याबद्दलची आमची दूरदृष्टी स्पष्ट आहे. त्यामुळे शहरात कोठे दारू धंदे, गांजा विक्री, बेकायदेशीर हुक्का पार्लर, रात्री उशिरापर्यंत बिअरबार चालत असतील तर नागरिकांना आम्ही आवाहन करतो की, कृपया आम्हाला संपर्क करा.
पोलीस ठाण्याला माहिती द्या, नियंत्रण कक्षाला कॉल करा. आम्ही त्यावर तत्काळ कारवाई करू. तुम्ही फक्त फोन करा, प्रत्येक वेळी कारवाई करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही जरी वर्दीतील पोलीस असलो तर तुम्हीदेखील साध्या वेशातील पोलीस आहात. त्यामुळे तुमचेसुद्धा कर्तव्य आहे. दरम्यान, या वेळी 85 तक्रारदारांना सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल परत करण्यात आला असता, मुद्देमाल परत मिळालेल्या नागरिकांनी आपला अनुभव व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.