Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जैन पाठशाळांना अनुदान, विहार धाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय

जैन पाठशाळांना अनुदान, विहार धाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय
 

महामंडळाच्या योजनांसाठी सहकार्य करू मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई: जैन धार्मिक ट्रस्ट च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना व जैन साधु-साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहारधाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसऱ्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

राज्याचे क्रिडा व अल्पसंख्यक मंत्री नाम. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्री दालनात संपन्न झालेल्या बैठकीची माहीती देताना ते बोलत होते. या बैठकीस अल्पसंख्यक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, उपसचिव मो. बा.ताशिलदार, जैन महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनिल पाटणी, व्यवस्थापकीय संचालक जी.पी. मगदुम, विशेष निमंत्रित संदीप भंडारी, जयेश ओसवाल, नीरव देढीया यांच्यासह उपसचिव विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळातुन राबवावयाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन, व्यापार, उ‌द्योग, शेती कर्ज, महिला बचतगट अर्थसहाय्य, गृह कर्ज, विधवा पेन्शन या योजना एप्रिल २०२५ पासून सुरू करण्यासाठी अतिरीक्त निधि ची मागणी केली. अल्पसंख्यक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळाच्या योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन अतिरीक्त निधि उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे बैठक आयोजित करू असे सांगितले.

जैन मंदीर, स्थानक, संघ या नोंदणीकृत संस्थाद्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात अशा पाठशालामध्ये जैन विद्यार्थी, जैन महिला शिक्षण घेतात त्यांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या प्राकृत भाषेचे, संस्कृत भाषेचे तसेच संगणक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्याचा तसेच पूर्णपणे पायी विहार (यात्रा) करणाऱ्या जैन साधू सार्धीना त्यांच्या यात्रा मार्गात सोय नसलेल्या ठिकाणी विहारधाम निर्माण करताना ते प्राधान्याने सरकारी, निमसरकारी शाळांच्या क्षेत्रात उभारले जातील त्यामुळे या सुविधांचा शाळांसाठी सुध्दा उपयोग होईल असाही निर्णय घेण्यात आल्याची माहीती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. अल्पसंख्यक मंत्रालयाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या गतीशील कामकाजासाठी मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. व्यवस्थापकीय संचालक जी.पी. मगदुम यांनी सभा संचलन व आभारप्रदर्शन केले.
फोटो कॅप्शन: जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसऱ्या संचालक मंडळ सभेत मार्गदर्शन करताना मंत्री नाम. दत्तात्रय भरणे, अध्यक्ष ललित गांधी, सचिव रूपेश जयवंशी व इतर मान्यवर

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.