Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुनावणीला सरकारी वकीलच गैरहजर, मुख्य आरोपीच्या जामीनाचा मार्ग मोकळा

सुनावणीला सरकारी वकीलच गैरहजर, मुख्य आरोपीच्या जामीनाचा मार्ग मोकळा
 

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी देशमुख कुटुंबियांनी मस्साजोग येथे पाण्याच्या टाकीवर चढून सोमवारी सकाळी आंदोलन केले. त्याचवेळी दुसरीकडे खंडणी आणि खुनातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे विशेष सरकारी वकील हेच सुनावणीला गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने विष्णू चाटे याला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचाच अर्थ विष्णू चाटे याचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विष्णू चाटे याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीत आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विष्णू चाटे याला १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विष्णू चाटे हा खून प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी
खंडणी आणि खून प्रकरणातील विष्णू चाटे हा अतिशय महत्वाचा आरोपी असून, त्याच्याच मोबाईलवरून वाल्मिक कराड याने धमकी दिली होती, असे सांगितले जाते. त्याचा फोन पोलिसांना अजूनही मिळालेला नाही. अशा परिस्थितीत त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आणि पर्यायाने त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याने तसेच सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीने अनेक शंका कुशंका उपस्थित होत आहेत. सरकारी वकिलांच्या गैरहजेरीचे कोणतेही कारण समोर येऊ शकलेले नाही.

एकीकडे खून आणि हत्या प्रकरण संलग्न असल्याचे सांगितले जात असताना आणि कुटुंबियांनी कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करून घ्या, अशी मागणी केलेली असताना सरकारकडून तशी पावले उचलली गेली नाहीत. त्याचवेळी चौकशी पूर्ण झालेली नसताना आणि कृष्णा आंधळे नामक एक आरोपी फरार असताना प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयीन कोठडी कशी मिळते, यावरून विविध सवाल विचारले जात आहेत.

न्यायालयात काय घडलं?
आरोपी विष्णू चाटेला १८ डिसेंबरपासून पोलीस कोठडी देण्यात आली आणि सरकारी पक्ष अजूनही पोलीस कोठडी मागतो आहे मग इतके दिवस पोलिसांनी काय केले? आता पुन्हा पोलीस कोठडी कशासाठी हवी आहे? ११ तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याआधी ९ तारखेला खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, पोलीस कारण नसताना आरोपींची पोलीस कोठडी मागत आहेत, असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड.सचिन शेफ यांनी केला. आरोपी विष्णू चाटे यांने न्यायालयाकडे अर्ज केल्याची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली. मात्र अर्जात नेमके काय नमूद केले होते, याविषयी आम्हाला माहिती नसल्याचे ते म्हणाले. माननीय न्यायालयाकडे स्वतः विष्णू चाटे याने अर्ज केला होता. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.