शाळेत येताना -- जाताना शिक्षकाला खड्ड्यांचा त्रास; फावडे, टोपली घेऊन खड्डे बुजवायला विद्यार्थ्यांनाच जुंपले
छत्रपती संभाजीनगर : शाळेत शिक्षणासाठी दाखल विद्यार्थाना शाळेच्या वेळेतच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनाच जुंपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारात लहान मुले- मुली डोक्यावर
मातीची टोपली घेऊन खड्ड्यात टाकत आहेत. या धक्कादायक प्रकारचा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ११० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शिकवण्यासाठी सहा शिक्षक व चार महिला शिक्षक कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्यासोबत शिक्षक बाहेरच्या कामाला लावत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. असाच प्रकार पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला आहे.
शिक्षकांना होतो खड्ड्यांचा त्रास
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथून व भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. याच रस्त्यावरून पेंढापूर येथील शाळेत शिक्षक येत असतात. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून ये- जा करणाऱ्या शिक्षकांना त्रास होतो. शिक्षकांनी संबंधित विभागाला हे कळवण्याऐवजी चक्क शाळकरी मुलांच्या हाती टोपली व फावडे देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जुंपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
शिक्षकांच्या चुकांवर बोट ठेवणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील हा सर्व प्रकार आहे. दरम्यान मुलांकडून रस्त्यावरील खड्डे बुजवून घेत असलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून पालकांमधून शिक्षकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान याची दखल शिक्षण विभाग घेणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.