Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाव दाऊदपूर अन् दहशत दाऊदपेक्षाही खतरनाक, 'राख' माफियांच्या गावची गोष्ट

नाव दाऊदपूर अन् दहशत दाऊदपेक्षाही खतरनाक, 'राख' माफियांच्या गावची गोष्ट
 
 
बीड: सध्या राज्यासह देशात चर्चा होतेय ती बीड जिल्ह्याची. वारकरी सांप्रदायाचा वारसा, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे परळी वैजनाथाचे मंदिर, राज्यातील सर्व साखर कारखान्यांना मजूर तोड कामगार पुरवणारा कष्टकऱ्यांचा जिल्हा तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांची जन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा सध्या गुन्हेगारीच्या क्रुर कहाण्यांनी चर्चेत आला आहे.

बीडचा बिहार अन् मिर्झापूर करण्यात जितका इथल्या नेत्यांचा हात आहे तितकाच मोठा वाटा आहे राखेच्या राजकारणाचा. एकीकडे राखेतून भरारी घेऊन फिनिक्स पक्षी अनेकांसाठी आदर्श ठरतो. मात्र बीडमधील राखेतून वाल्मिक कराडसारखे माफिया गुंडाराज तयार होते अन् जिल्ह्याची राखरांगोळी होते. बीडमधील राजकीय सामाजिक, स्वास्थ नासवणारं, पैसा, दडपशाही, गुंडगिरीने इथल्या प्रशासकीय व्यवस्थेची राखरांगोळी करणारं हे भयावह राजकारण ऐकल्यास तुमच्याही अंगावर काटा उभा राहिलं.

औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा इतिहास..

साधारण, 1971 च्या काळात परळीमध्ये कोळश्यापासून औष्मिक उर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरु झाला. वर्षाला जवळपास 1380 ते 1400 मेगावॅटची निर्मिती या कोळश्यामधून होते. या जळालेल्या कोळशामधून दोन प्रकारची राख तयार होते एक सुखी राख अन् दुसरी ओली राख. 2010 पर्यंत या राखेची विक्री किंवा कमाईचे साधन म्हणून ओळख मिळाली नव्हती. परंतु त्यानंतरच्या काळात ही राख बांधकामांमध्ये, विटभट्ट्यांमध्ये वापरली जाऊ लागली अन् तेव्हापासून या राखेसाठी माफियांचा हैदोस सुरु झाला. परळीच्या या औष्णिक उर्जा प्रकल्पामधून दिवसाला जवळपास 600 ते 700 ट्रक राख उचलली जाते. या राखेच्या निविदा निघतात अन् आणि सिमेंट कंपन्या ती राख घेऊन जातात.

दाऊदपूर गावची खतरनाक स्टोरी
बीडमधील राखेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेलं एक गाव म्हणजे दाऊदपूर. नाव दाऊदपूर असलं तरी या गावाचा दाऊदपेक्षाही मोठा दरारा आहे. औष्णिक वीज केंद्रापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेले दाऊदपूर गावात साध्या घरांपेक्षा टोलेजंग बंगलेच पाहायला मिळतात. औष्णिक वीज प्रकल्पाला जमीन दिल्याने गावात पाण्यासारखा पैसा आला. याच पैशातून हे आलिशान, टोलेजंग बंगले बांधण्यात आलेत. हे टुमदार बंगले अन् प्रत्येक घरावर दिसत असलेला राखेचा थर इथल्या काळ्या दहशतीची प्रचिती देतो.
राखेतून पैसा अन् दहशत..

या गावातील बहुतांश तरुण हे राखेच्या धंद्यात गुंतलेले. राखेतून पैसा, पैशातून दहशत अन् वर्चस्व असा त्यांचा कार्यक्रम. मारामाऱ्या, खूनांचे प्रयत्न ,गोळीबार,खंडणी अशा अनेक प्रकरणांमध्ये या गावातील तरुण आरोपी आहेत. या सर्वांचा बाहुबली म्हणजेच वाल्मिक कराड. बीडमधील प्रत्येक निधी, व्यवहार हे वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर होतात. अगदी सरकारी अधिकारीही त्याच्याच धाकाखाली असल्याचे चित्र बीडमध्ये आहे. करा की तेवढं काम अशी धमकी आली की सरकारी अधिकारीही तातडीने वाल्मिकचा शब्द पाळतात, एवढी त्याची दहशत.
या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून दिवसाला जवळपास 600 ते 700 ट्रक राख गोळा होते. या एका ट्रकला बाजारात 18 ते 20 हजार रुपये एवढी किंमत आहे. याचाच अर्थ दिवसाला तब्बल 1 ते सव्वा कोटीची राख विकली जाते. म्हणजेच महिन्याला जवळपास 36 कोटींच्या घरात जातो तर वर्षाला साधारणत: 12 ते 15 हजार कोटींच्या राखेची विक्री होते.

ही राख गोळा करण्यासाठी टेंडर भरुन जवळपास १७ कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र स्थानिकांची दहशत इतकी की इथे कंत्राटदारांना फिरकूही दिले जात नाही. एखादा आलाच तर त्याला डोक्याला बंदूक लावून तिथेच शांत करायलाही हे बाहुबली धजावत नाहीत. राखेच्या काळ्या धंद्यातून मिळालेल्या पैशामुळेच हा छोट्याशा गावात फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, ऑडीसारख्या आलिशान गाड्या धुरळा उडवत फिरतात. या बाहुबलींची स्टाईलही त्यांचं वेगळेपण दर्शवते. हातात लाल पिवळी दोरा, कपाळावर वाल्मिक अण्णासारखा टीळा अन् हातात दोन मोबाईल असा त्यांचा पेहराव..

एकीकडे गावात राखेमधून भरभरुन पैसा येत असतानाच आरोग्याच्या समस्याही तितक्याच भेडसावत आहेत. गावाच्या घरांवर, दारांमध्ये पसरलेला ढीगभर राखेचा थर अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे रोग असलेले असंख्य पेशंट इथे आहेत, असं डॉक्टर सांगतात. मात्र याविरुद्ध ब्र काढण्याची कोणामध्ये हिंमत नाही.
थोडक्यात गँग्स ऑफ वासेपूरच्या धनबादमध्ये कोळश्याच्या पैशातून जसा गुन्हेगारीने कळस गाठला तशीच राखेच्या राजकारणाची दहशत अन् दरारा या दाऊदपूरमध्ये पाहायला मिळते. पण या गुन्हेगारीच्या बाहुबलींवर राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना वाल्मिकी म्हणूनच पुजले जाणार का? असाच सवाल आता उपस्थित होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.