बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात विवाहित मुलीला एआयव्हीची लागण झाल्याची अफवा पसरल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना सर्व गावकऱ्यांनी वाळीत टाकल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या तरुणीचा अलीकडेच मृत्यू झाला होता.
बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून या महिलेला एचआयव्ही झाल्याचे निदान करण्यात आले होते. मात्र, मुलीच्या वडिलांनी याप्रकरणात पोलीस आणि बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आणि डॉक्टरांच्या संगनमताने माझ्या मुलीला HIV झाल्याची अफवा गावात पसरवण्यात आली, असा आरोप मुलीचे वडील राजेंद्र जाधव यांनी केला आहे.
राजेंद्र जाधव यांची मुलगी श्रद्धा हिचे 2023 साली आष्टी तालुक्यातील बालाजी वडेकर यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, हुंड्यासाठी सासरी तिचा छळ सुरु होता. जावई बालाजी वडेकर, सासरे राजेंद्र वडेकर, दीर विशाल वडेकर , जाऊ वैशाली विशाल वाडेकर, नणंद भाग्यश्री विटकर आणि राजश्री पवार यांच्याकडून श्रद्धाचा दोन लाखांच्या हुंड्यासाठी छळ झाला. श्रद्धावर अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार करण्यात आले, तसेच तिला जबर मारहाण झाली. श्रद्धाला भिंतीवर ढकलण्यात आल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला होता. तिला अहमदनगरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, याठिकाणी तिच्यावर मोठे ऑपरेशन झाले. यानंतर श्रद्धाला आम्ही सासरी आणले. तेव्हा सासरच्यांनी आमच्या घरी येऊनही श्रद्धाला मारहाण केली, असे राजेंद्र जाधव यांनी जिल्हाधिकऱ्यांना लिहलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
मुलीच्या वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप
श्रद्धाला करण्यात आलेल्या मारहाणीची आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला. पण पुढे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. साधा माझा जबाबदेखील घेण्यात आला नाही. तर बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनीही आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. आष्टी पोलीस ठाण्याचे पी.आय व बीट अंमलदार काळे आणि बीड शासकीय रुग्णालयातील डॉ. ढाकणे यांच्या मनमानी कारभारामुळे समाजात आमची बदनामनी झाली. काळे यांनी माझ्या मुलीचे प्रेत घरी घेऊन जात असताना गावातील लोकांना मुलीला HIV झाल्याचे सांगितले. तुम्ही तिच्याजवळ येऊ नका, असेही ते गावकऱ्यांना म्हणाले. यामुळे माझ्या मुलीच्या अंत्यविधीला गावातील कोणीही आले नाही. पोलीस याप्रकरणात अजूनही आमचा जबाब नोंदवून घेत नाही, ते आरोपींना मदत करत आहेत. या सगळ्यामुळे माझी पत्नी आणि मुलांनी धसका घेतला आहे. माझी दोन्ही मुलं आईपासून दूर राहत आहेत, तिच्या हातचे जेवतही नाहीत. या सगळ्याचा मानसिक धक्का बसल्याने माझ्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.