Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ज्ञानज्योति' फातिमा शेख 'काल्पनिक' नसून वास्तवात असल्याचे.!

'ज्ञानज्योति' फातिमा शेख 'काल्पनिक' नसून वास्तवात असल्याचे.!
 

‘’फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही....’’

10 ऑक्टोबर 1856 रोजी महात्मा जोतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी किती आपुलकीने आणि विश्वासाने या ओळी लिहिल्या असतील ना?  या ओळी ज्या व्यक्तीच्या बाबतीत लिहिल्या त्या व्यक्तीवर किती जबाबदारी दिलेली असेल ना ? आणि ती जबाबदारी ती व्यक्ती पार पाडेल हा विश्वास देखील या पत्रात दिसून येतोय. कधी कधी एकाच ओळीतून बरच काही सिद्ध होत असतं. अशी ही अजरामर ओळ...

पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपुलकीने लिहिलेल्या या ओळीवर देखील शाब्दिक शेण चिखल फेकायला 21व्या शतकातील मनुवादी कमी करत नाहीत. यांच्या स्वभावातील हा दोष कित्येक महात्मे होऊन गेले तरीही जात नाही. बरं, मला एक सांगा कोणी एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या पत्रात आपुलकीने, आपल्या मुलीच्या नात्याने, आपल्या बहिणीच्या नात्याने जर लिहीत असेल तर तिथे लिहिणारी व्यक्ती त्याचे आडनाव कधी लिहितो का? समजा मी माझ्या बायकोला पत्र लिहिले आणि त्यात माझ्या मुलीचा उल्लेख करताना मी नक्की काय लिहिणार?


टॉम लिहिणार, अलिशा लिहिणार की पूर्ण नाव लिहिणार? ऑबीयसली मी टॉम किंवा अलिशा असेच लिहिणार. आपुलकीने लिहिली जाणारी पत्रे ही आपुलकीने वाचायची असतात. तेंव्हाच ती समजून येतात. हा काय सिंघम सिनेमा नाही जिथे बायकोपासून, आई- बाप, सासू-सासरे सगळेच बाजीराव नाव असणाऱ्या माणसाला सिंघम म्हणून आडनावाने हाक मारतात. पत्रात पूर्ण नाव नाही असा युक्तिवाद मांडणाऱ्या महोदयांचा मला जाहीर सत्कार करायचा आहे.

‘सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय’ ग्रंथात फातिमा यांच्या फोटोचा उल्लेख

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्याकडून प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे ‘सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय’ या पुस्तकात या पुस्तकाचे संपादक डॉ. मा. गो. माळी हे संपादकाचे मनोगतमध्ये पान क्रमांक 25 वर म्हणतात "सावित्रीबाईंच्या छायाचित्रबद्दलची स्पष्टीकरणे देणे आवश्यक आहे. पूर्वी हे छायाचित्र 'मजूर' या पुण्यामध्ये प्रसिद्ध होत असलेल्या पत्रात प्रसिद्ध झाले होते. हे पत्र पुण्यात 1924 ते 1930 या काळात निघत होते. या पत्राचे संपादक कै. ना. रा. लाड हे होते. हे छायाचित्र मला श्री. द. स. झोडगे यांच्याकडून मिळाले. स्वतः झोडगे 'मजूर' पत्राचे काही काळ उपसंचालक होते. त्यांनी या छायाचित्राबाबत अधिक स्पष्टीकरण केले.


लोखंडे नावाच्या एका मिशनरी गृहस्थाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात सावित्रीबाईंचा ग्रुप फोटो होता. तो फोटो व प्रसिद्ध झालेल्या 'मजूर' पत्रातील फोटोत साम्य आहे. त्या ग्रुप फोटोवरून सावित्रीबाईंचे छायाचित्र काढले आहे. 1966 साली प्रसिद्ध झालेल्या 'महाराष्ट्राच्या कर्तृत्वशालिनी' (लेखिका : प्रा. लीला पांडे) या पुस्तकातही जे रेखाचित्र पहावयास मिळते त्या रेखाचित्रात व या छायाचित्रात कोणताही फरक नाही. या छायाचित्रांशीवाय इतर छायाचित्रांबाबत मी शहानिशा करून घेतली आहे. पुण्यात एकनाथ पालकर यांच्याकडे काही निगेटिव्हज होत्या. झोगडे यांना त्या उपलब्ध झाल्या. त्यावरून सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचे छायाचित्र उपलब्ध झाले."
 
(10 ऑक्टोबर 1956 रोजी महात्मा जोतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात फातिमा यांचा केलेला उल्लेख)

वरील उतारा वाचल्यावर स्पष्टपणे लक्षात येते की फातिमा शेख यांचा फोटो हा 100 वर्षांपेक्षा आधीपासूनच उपलब्ध होता. जो सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या 'सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय' आणि 'सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व' या महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकात उपलब्ध आहे. जो फातिमा शेख यांच्या असण्याची जिवंत साक्ष देतोय.
फातिमा शेख या शिक्षिका होत्या का नव्हत्या? हा प्रश्न देखील अनेकांना पडतोय. प्रश्न पडायला हवेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्याकडूनच प्रकाशित झालेल्या ‘सावित्रीबाई फुले : काल आणि कर्तृत्व’ या पुस्तकात पान क्रमांक 67 वर अनिल प्रांजळे लिहितात, "कोणत्याही समाजातील नवीन पिढी शरीराने, मनाने व संस्कारांनी निरोगी व्हावयाची असेल, त त्या समाजाचे नैतिक स्वास्थ्य निरोगी, स्वच्छ व सुसंस्कृत असावे लागते. त्याअर्थी सावित्रीबाई खऱ्या अर्थाने महान समाजतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ होत्या, हे सिद्ध होते. याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे सावित्रीबाईंनी केलेले शिक्षणाचे प्रयोग! पहिला प्रयोग म्हणजे शुद्रातिशूद्र मुलींच्या शाळेत स्वतः व फातिमा शेख यांनी शिकवून ब्राह्मण मुलींच्या शाळेवर ब्राह्मण शिक्षक ठेवले."

महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात फातिमा शेख यांचा स्पष्ट उल्लेख
 
 
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात स्पष्ट उल्लेख आहे की, फातिमा शेख यांनी शुद्रतिशूद्रांना शिकवले. या पुस्तकाचे तब्बल चार संपादक आहेत. प्रा. डॉ. मा. गो. माळी, श्रीमती निला उपाध्ये, डॉ. निर्मलकुमार फडकुले आणि डॉ. सुभाष सावरकर. या सर्वांचे पुरावे मी सादर केलेले आहेत. याहीपलीकडे याच पुस्तकात उस्मान शेख यांच्या वाड्यात 1 मे 1849 साली प्रौढांसाठी शाळेची स्थापना झाल्याचा आणि याच वाड्यात अध्ययन कार्य होत असल्याचा पण उल्लेख आहे.

आता प्रश्न आहे या फोटोतील फातिमा शेख आणि पत्रातील फातिमा या वेगवेगळ्या कशा आहेत ? सावित्रीबाई फुले ग्रुप फोटो काढताना एखाद्या महत्वाच्या व्यक्तीलाच बाजूला बसवतील की ज्यांचे कशातच काही योगदान नाही अशांना बसवतील ? याचा थोडा सद्सद्विवेक बुद्धीने विचार करा. पत्रातील आपुलकीने ज्यांच्यावर सावित्रीमाई व्यक्त झाल्या त्या इतर कोणीही नसून फोटोतील फातिमा शेखच आहेत असाच यातून निष्कर्ष निघतो. दुसरा असेल तर तो मांडा आणि दुसरी फातेमा पण समोर आणा.

मनुवादी पिलावळ फक्त फातिमा शेख यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात का ? तर नाही. त्यांना जे जे त्यांच्या असमनतावादी विचारांना धोकादायक वाटते त्या सर्वांना त्यांचा विरोध असतो. महात्मा जोतिबा फुले यांच्या पश्चात त्यांचा पुतळा पुण्यात उभारावा असा प्रस्ताव देशभक्त केशवराव जेधे यांनी जुलै 1925 साली ठेवला होता. त्याला पुण्यातील ब्राह्मणांनी चांगलाच विरोध केला होता, त्यांची टवाळकी करणारे लेख लिहिले होते.
(‘सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय’ या पुस्तकात फातिमा यांच्या छयाचित्राबद्दलच्या नोंदी)

"पुण्यातील नागरिकांची कोणती सेवा जोतिरावांनी केली की त्यामुळे त्यांचे सार्वजनिक स्मारक करून त्यांनी त्योच उतराई व्हावे ? - कै. जोतीराव हे 'पब्लिक' म्हणजे सार्वजनिक गृहस्थ नसून 'सेक्शनल' म्हणजे विशिष्ठ पंथीय होते. श्री. जेधे यांनी आपला ठराव मुकाट्याने मागे घ्यावा अशी त्यांना आमची मित्रत्वाची सूचना आहे. जोतीरावांचा पुतळा बसनवण्यास अगदी योग्य स्थळ म्हणजे पुणे शहर नसून कोल्हापूर होय." असा पवित्रा पुण्यातील ब्राह्मणांनी घेतला होता. त्यावेळी सरकार नियुक्त सभासद नुरुद्दीन काझी यांनी देशभक्त केशवराव जेधे यांची बाजू घेतली होती. हा इतिहास आहे. त्याकाळी या संपूर्ण प्रकरणावर दिनकरराव जवळकर यांनी 'देशाचे दुष्मन' हे पुस्तक लिहिले होते ते अवश्य वाचावे. त्यात या संदर्भात सगळे पुरावे मिळतील. या पुस्तकाचा कायदेशीर लढा खुद्द विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढला आणि जिंकलाही होता. हे देखील इथे नमूद करावे वाटते अध्यक्ष महोदय.

मात्र, फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षित महिला नव्हत्या…

राहिला प्रश्न फातिमा शेख यांच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका असण्याचा तर त्या भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका असूही शकतात. पण त्या पहिल्या मुस्लिम शिक्षित महिला होत्या का ? तर नाही. पैगंबर साहेबांच्या काळापासूनच मुस्लिम महिलांना शिक्षणाचा, वाचण्याचा, लिहिण्याचा अधिकार होता. खुद्द हजरत आयेशा यांनी 2210 हादिस लिहिलेल्या आहेत. हे शिक्षणाशिवाय होत असते का ? 1818 साली महिला असलेल्या आणि हाफिज-ए-कुराण असलेल्या मूहम्मदी बेगम यांनी तहजीब-ए-निःस्वान नावाचे साप्ताहिक काढले होते. त्यातून त्या प्रखर स्त्रीवादी भूमिका आपल्या लेखातून मांडायच्या.
मुस्लिमांचा पुरोगामी चळवळीतील इतिहास देखील बराच प्रदीर्घ आणि मोठा आहे. सर सय्यद अहमद खान यांच्यासारखे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणारे स्वयंभू कर्ते पुरुष समाजात निर्माण झालेले आहेत. अगदी महात्मा फुलेंचे शिक्षण सुरू करावे असे सांगणारे गफ्फार मुंशी बेग असो की महात्मा फुलेंना घरातून काढून टाकल्यावर स्वतःकडे आसरा देणारे उस्मान शेख असो. असे महत्वाची भूमिका बजावणारे कित्येक जण येऊन गेले आहेत. पण समाजाने त्यांची दखल घेतली नाही. ही मुस्लिम समाजाची घोडचूक अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही. आज किती मौलाना आणि इमाम लोकांनी फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले ? यावर देखील चार्चा व्हायला हवी. हा विषय काढला की तोंड लपवणाऱ्या मुस्लिमांची देखील कमी नाही.

1400 वर्षे मागे अजूनही समाज अडकून पडलेला आहे. त्यांना मधले काहीच शोधायचे नाही. आणि त्यातून काही बोधही घ्यायचा नाही. म्हणून फातिमा शेख यांच्या सारख्या समाजसुधारक स्त्रिया इतिहासाच्या पानात एका ओळीत खितपत पडल्या. त्यावर आता कुठे संशोधन सुरू झाले आहे. जानेवारी 2023 मध्ये ज्ञानज्योति फातिमा शेख यांचा पहिला पुतळा आंध्रप्रदेश मध्ये बसवला गेला आहे.
त्यांच्या आठवीच्या अभ्यासक्रमात फातिमा शेख यांचा धडा देखील आला. ही प्रगती हळूहळू होत आहे. अशा कित्येक ऐतिहासिक व्यक्तींवर सतत संशोधन सुरू असते. पण बहुजनवादी, पुरोगामी, सुधारणावादी विचार बाळगणाऱ्या थोर विभूती नव्याने समोर आल्या की लगेच मनुवाद्यांच्या पोटात दुखायला सुरू होते. ही त्यांची नेहमीची सवय आहे. या सवयी समजून घेत आपले संशोधन सुरू ठेऊ.

( जानेवारी 2023 मध्ये ज्ञानज्योति फातिमा शेख यांचा पहिला पुतळा आंध्रप्रदेश मध्ये बसवला गेला आहे.)

ज्ञानज्योति फातिमा शेख या काल्पनिक पात्र नाहीत तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या, शुद्रतिशूद्रांना शिकवणाऱ्या ग्रुप फोटोत असणाऱ्या एक महान नायिका होत्या. ज्यांना घडवण्यात सर्वात मोठे योगदान हे क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे होते. यात कसलीही शंका नाही. महाराष्ट्रातील संस्कृतीच्या तत्कालीन वेशातील फातिमा शेख, मुस्लिम समाज हा त्याच वेशभूषेत स्वीकारेल या अपेक्षेसह फातिमा शेख यांना मनापासून विनम्र अभिवादन.

लव यु फातिमा माय…

(सौजन्य - पैगंबर शेख यांच्या फेसबुक वॉलवरून)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.