अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'छावा' प्रदर्शनासाठी सज्ज आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यानंतर या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. मात्र, यातील काही आक्षेपार्ह दृश्ये सिनेमातून काढून टाकण्यात यावीत या मागणीने जोर धरला आहे.
'छावा'वरील काही दृश्यांवर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप नोंदवला होता. यानंतर संभाजीराजे भोसले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, महाराजांचे कार्य जगभरात पोहोचावे मात्र त्यांची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची काळजी घ्यावी. इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सिनेमामध्ये योग्य ते बदल करावेत असे ते म्हणाले आहे. इतकेच नाही, तर महाराजांच्या प्रतिमेला धक्का बसणे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी उदय सामंत यांनी दिला आहे.
या प्रकरणी आता उदयनराजे भोसले यांनी थेट 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले असून त्यातील आक्षेपार्ह दृश्यांवर त्यांचे मत मांडले आहे. चित्रपटात जर काही आक्षेपार्ह घटना आणि दृश्ये दाखवली गेली असतील तर त्या डिलीट करून लोकांपर्यंत चांगला चित्रपट लवकरात लवकर पोहोचावा. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी, धर्मासाठी केलेले योगदान हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली आहे.इतिहास तज्ज्ञ आणि इतिहास अभ्यासक यांना हा चित्रपट दाखवून त्याची व्यवस्थित मांडणी करूनच हा चित्रपट रिलीज करावा जेणेकरून समाजामध्ये या गोष्टीबाबत वाद निर्माण होणार नाही असे उदयनराजे म्हणाले. यावेळी स्वतः 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लोकांच्या भावनांचा आदर करून चित्रपटात योग्य ते बदल करून लवकरच चित्रपट प्रदर्शित करू असा विश्वास व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.