सोलापूर : सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांमध्ये व उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाना घेतला आहे, त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावेत, असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिले आहेत. मुदतीत परवाना जमा न केल्यास ऑटोरिक्षांवर कारवाई केली जाणार असून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. तत्पूर्वी, आरटीओ कार्यालयातून रिक्षाचे परमीट घेतले, त्यांची यादी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे देऊन पडताळणी केली जाणार आहे. सध्या सोलापूर शहरात १३ हजारांहून अधिक तर सोलापूर आरटीओकडून परवाने घेतलेल्या ऑटोरिक्षांची संख्या १६ हजार ९७३ आहे. सोलापूरसह राज्यभरात वाढत असलेल्या रिक्षांच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर शहरातील रस्त्यांलगतचे अतिक्रमण, रस्त्यांवर थांबणाऱ्या रिक्षा, हातगाडे, तुटलेल्या रस्ता दुभाजकातून शॉर्टकट, हेल्मेट नाही, अतिवेग, मोबाईल टॉकिंग, मद्यपान करून वाहन चालविणे, जड वाहतूक अशा कारणांमुळे दरवर्षी सोलापूर शहराच्या हद्दीत सरासरी ६५ ते ७० जणांचा अपघातात जीव जातोय. तरीदेखील वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. २०२४ मध्ये अडीच लाख वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना तब्बल २२ कोटी ६१ लाखांचा दंड करण्यात आला आहे.दरवर्षी सोलापूर शहर-जिल्ह्यातील रस्ते अपघातात सरासरी ७०० जणांचा मृत्यू होतोय. दरम्यान, सोलापूर वाहतूक पोलिसांनी २०२४ मध्ये विनाहेल्मेट ४० हजार ६७३ दुचाकीस्वारांवर, २४ हजार १८४ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या २० हजार ३७४ आणि ७९ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २१० जणांवर कारवाई केली आहे. तरीपण, सिग्नलच्या ठिकाणी दोन वाहतूक अंमलदार दिसतात, पण ज्याठिकाणी गरज आहे किंवा अपघाताची शक्यता आहे अशा अपघातप्रवण ठिकाणी एकही वाहतूक अंमलदार दिसत नाही अशी वस्तुस्थिती आहे. याशिवाय वाहनचालक विशेषतः दुचाकीस्वार लेन कटिंगचा नियम पाळत नाहीत. जड वाहन रस्त्याने जात असताना त्यास ओव्हरटेक करून पुढे जाण्याची घाई दुचाकीस्वार करताना दिसतात. पोलिस आयुक्तांनी वर्दळीच्या रस्त्यावरील जड वाहतूक बंद करावी आणि बेशिस्त वाहनांवरील कारवाईसाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
सोलापुरातील कारवाईची दोन वर्षातील आकडेवारी
सन एकूण कारवाई दंडाची रक्कमअपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना
२०२३१,५५,५५६ १२,३७,५३,१००
२०२४ २,४५,२४९२२,६१,९३,९००
एकूण ४,००,८०५ ३४,९९,४७,०००
अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून आता महामार्गांवर कमानी उभारून त्यावर सीसीटीव्ही लावून बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याचे नियोजित आहे. शहरातील अपघाताची कारणे वेगळी असून त्यावर ठोस उपायांची गरज आहे.
- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
बेशिस्त वाहनांवर मोठ्या प्रमाणावर होईल कारवाई
रस्त्यांलगत उभारलेल्या वाहनांवर, नो पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या वाहनांवर, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली जाईल. याशिवाय अपघातप्रवण ठिकाणी आता वाहतूक पोलिस नेमण्याचेही नियोजन आहे.
- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.