हातकणंगलेत लाच स्वीकारताना पुरवठा विभागाचे दोघे जाळ्यात
हातकणंगले : येथील तालुका पुरवठा विभागाकडे काम करणारा खासगी संगणक ऑपरेटर सुभाष मधुकर घुणके (वय ३४, रा. घुणके मळा, यळगुड) आणि त्याचा सहकारी शैलेंद्र महादेव डोईफोडे (वय २२, रा. सनगर गल्ली, पेठवडगाव) या दोघांना २५०० रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या दोघांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदार याचे नाव शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत वरिष्ठांना सांगून समाविष्ट केले आहे. त्यासाठी सुभाष घुणके याने तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती. यात तडजोड होणार नसल्याचे सांगून त्यांच्याकडून २५०० रुपयांची लाच शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात पंचासमक्ष घेत असताना लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकला.कर्मचारी गेले कुठे
लाचलुचपतच्या पथकाने सुभाष घुणके व त्याचा सहकारी शैलेंद्र डोईफोडे या दोघांना २५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या दोघा आरोपींविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावने यांच्या पथकाने केली.
शासनाने कोणत्याही कार्यालयामध्ये उमेदवार अथवा खासगी कर्मचारी नियुक्त करायचे नाहीत, असे स्पष्ट आदेश दिलेले असताना हातकणंगले तहसीलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूला खासगी कर्मचाऱ्याचे टेबल असल्याने कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारात त्यांचे काम सोपे होण्यासाठी असे कर्मचारी बसवले आहेत का ? अशी शंका पक्षकारांना आहे.
वरिष्ठांची डोळेझाक
महसूल विभागाकडील पुरवठा विभाग सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, गैरव्यवहार, एजंट आणि अन्नधान्याचा विषय नेहमी वादग्रस्त ठरत आहे. एजंट, खासगी इसम रेशन कार्डधारकाची लूट करत असल्याची तक्रार असूनही वरिष्ठ याकडे डोळेझाक करत असतात. त्यामुळे या विभागात चिरीमिरीचे प्रकार वाढले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.