पत्नीला घेऊन पाकिस्तानात जातो; बडतर्फ चंदू चव्हाण यांचे मंत्रालयासमोर आंदोलन
मुंबई : भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचा ठपका ठेवून भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण यांनी आज, बुधवारी (1 जानेवारी) कुटुंबासह मंत्रालयासमोर आंदोलन केले.
आपल्यावर झालेली बडतर्फीची कारवाई अन्यायकारक असून यामुळे कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली असल्याचे सांगत चव्हाण यांनी आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह दाखल होत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
चंदू चव्हाण हे धुळे जिल्हयातील आहेत. भारतीय सैन्यदलात ते जवान म्हणून कार्यरत होते. भारतीय सीमा ओलांडून ते पाकिस्तानच्या हददीत गेल्याने त्यांना पाकिस्तानात अटक झाली होती. ते 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. केंद्र सरकाच्या प्रयत्नानंतर त्यांना भारतात आणले गेले. यानंतर त्यांचे धुळे जिल्ह्यात स्वागतही झाले. मात्र सैन्य दलाच्या कारवाईनंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई अन्यायकारक असून आपल्याला खासगी ठिकाणीही नोकरी मिळत नसल्याने आपण कर्जबाजारी झालो आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला सैनिकांची पेन्शनही सुरू झाली नसल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले.
लष्करी जवान असूनही आपल्याला दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात आहे. गेली 11 वर्षे आपण लढा देत आहोत. सर्जिकल स्ट्राइकदरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांना पदकाने सन्मानित करण्यात येते. पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जाते आणि माझ्यावर कारवाई केली जाते. आपणच आता पत्नीला घेऊन पाकिस्तानात जातो, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखविली. अशा प्रकारे हजारो सैनिकांना अन्यायकारक कारवाईला सामोरे जावे लागते, हा मोठा घोटाळा असून तो आपण बाहेर काढणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले होते. 3 महिने 21 दिवस चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी सैन्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर चंदू चव्हाण भारतात परतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.