वसई- वसईतील ब्रेथ केअर रुग्णालयाचा डॉक्टर धर्मेद्र दुबे याच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२४ मध्ये एका रुग्णाच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ दुबे सध्या फरार आहे.
डॉ धर्मेंद्र दुबे याचे वसई पश्चिमेच्या आनंद नगर येथे ब्रेथ केअर रुग्णालय आहे. १८ मार्च २०२३ रोजी रुपेश गुप्ता (२७) या तरुणाला उपचारासाठी आणले होते. या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गुप्ताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयातही गोंधळ घातला होता. हे प्रकरण पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविण्यात आले होते. वैद्कीय कागदपत्रे, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, नातेवाईकांचे जबाब तपासून जिल्हा शल्य चिकित्सकांनी आपला अहवाल माणिकपूर पोलिसांना सादर केला आहे. त्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा रुपेश गुप्ता याचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार डॉ दुबे याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णाला डॉ दुबे याने न तपासता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तपासले होते. त्याला रुग्णवाहिकेतून नेताना व्हेंटीलेटर लावले नव्हते, ऑक्सिजन दिला नव्हता असे तपासात निष्पन्न झाल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरिष पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे रुग्णाला न तपासताही डॉ दुबे यांनी त्याचे चार्जेस बिलात आकारले होते. सध्या डॉक्टर फरार असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत असे पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी डॉ धर्मेंद्र दुबे यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद आढळून आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.