सोलापूर :- सूर्यास्तानंतर अटक केल्याचा ठपका, तीन मिनिटांचा उशीर पोलिसांच्या अंगलट; महिलेला जामीन मंजूर
सुर्यास्तानंतर अवघ्या तीन मिनिटांनी महिलेला ताब्यात घेणे पोलिसांच्या अंगलट आहे. ही अटक बेकायदा ठरवत उच्च न्यायालयाने या महिलेला जामीन मंजूर केला. याने पोलिसांना चांगलीच चपराक बसली आहे.
पायल वर्मा असे या महिला आरोपीचे नाव आहे. टेंभूर्णी पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवून माझ्या सुटकेचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्या. सारंग कोतवाल व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. नियमानुसार महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही, असा दावा पायल यांच्याकडून करण्यात आला होता. हा मुद्दा मान्य करत न्यायालयाने वर्मा यांना सशर्त जामीन मंजूर केला.
अटक करता येईल
आम्ही पायल यांना 30 हजार रुपयांचा जामीन मंजूर करत आहोत. यापुढे पायल यांना अटक करण्यापासून आम्ही पोलिसांना प्रतिबंध करत नाही आहोत. अटक करायची असल्यास पोलिसांनी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करायला हवी, असे खंडपीठाने नमूद केले.
सूर्यास्त 6.45 झाला होता
अटकेच्या दिवशी करमाळा येथे 6.45 मिनिटांनी सूर्यास्त झाला होता. आम्ही 6.40 मिनिटांनी पायल यांना ताब्यात घेतले. त्यांची अटक अवैध ठरत नाही, असा पोलिसांचा दावा होता.
सुर्यास्त 6.37 ला झाला
मला अटक झाली तेव्हा सूर्यास्त झाला होता. त्या दिवशी सूर्यास्त 6.37 वाजता झाला होता, असे महिलेने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेला तपशीलही महिलेने न्यायालयात सादर केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.
काय आहे प्रकरण
सोलापूर येथील पायल यांच्याविरोधात पहिला फसवणुकीचा गुन्हा 20 जून 2024 रोजी करमाळा पोलिसांत नोंदवण्यात आला. गुंतवणुकीचे आमिष दाखवून लुटल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. या गुह्यात त्यांना अटक झाली. महानगर दंडाधिकारी यांनी त्यांना जामीन मंजूर केला. जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ गेल्याने त्या कारागृहातच होत्या. त्याचदरम्यान पायल यांच्याविरोधात दुसऱया गुह्याची नोंद करण्यात आली. जामिनाची प्रक्रिया पूर्ण करून कारागृहाबाहेर पडताच पोलिसांनी दुसऱया गुह्यासाठी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी संध्याकाळचे 6.40 वाजले होते. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास अटकेची प्रक्रिया पूर्ण केली, असा पायल यांचा आरोप होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.