Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कामे करा अथवा निलंबनाला सामोरे जा..! नूतन आरोग्यमंत्र्यांनी घेतला आरोग्‍य अधिकाऱ्यांचा तास

कामे करा अथवा निलंबनाला सामोरे जा..! नूतन आरोग्यमंत्र्यांनी घेतला आरोग्‍य अधिकाऱ्यांचा तास
 

पुणे : ''विधानसभेतील माझे आतापर्यंतचे रेकॉर्ड बघा, निलंबनासाठी सर्वाधिक आग्रह धरणारा आमदार मी आहे. आता राज्‍यात सर्वाधिक निलंबन करणारा मंत्री मी असेल. आरोग्‍यसेवा हे लोकांच्‍या गरजेचे काम आहे. यामध्‍ये कारवाई करताना कुणाची दया माया करायची गरज नाही. एकीकडे लोक रस्‍त्‍यावर आहेत ज्‍यांना नोकरी नाही. या खात्‍यात सातव्‍या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळतो. चुकीचे कामे करून पैसे मिळवू नका. लोकांचे काम करा अथवा निलंबनाला सामोरे जा!'' असा सज्‍जड इशारा नूतन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वरिष्‍ठ आरोग्‍य अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिला.

नूतन आरोग्‍यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्‍य खात्‍याचा पदभार स्‍वीकारल्‍यानंतर प्रथमच पुण्‍यातील जिल्‍हा रुग्‍णालय, येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्‍णालयाला शुक्रवारी भेट देत पाहणी केली. यानंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  त्‍यावेळी राज्‍याचे आरोग्‍य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, पुणे परिमंडळचे आरोग्‍य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्‍य आरोग्‍य शिक्षण संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्‍कर, येरवडा मनोरुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील हे अधिकारी उपस्थित होते. डॉ. अंबाडेकर हे पत्रकारांशी बोलत नाहीत. त्‍यांचे फोनही घेत नाहीत यावरून आरोग्‍यमंत्री यांनी अंबाडेकरांची चांगलीच कानउघाडणी केली.
'येरवडा मनोरुग्‍णालयात जेव्‍हढे स्‍वच्‍छता कर्मचाऱ्यांना निम्‍माच पगार ठेकेदार देतो. त्‍यावरून आंदोलने झाली. मनोरुग्‍णांची स्‍वच्‍छतागृहे घाण आहेत. तसेच, सौरऊर्जा पॅनेल बसवण्‍याचे काम अपूर्ण झाल्‍याने रुग्‍णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. कामाचे संपूर्ण बिल मात्र कंत्राटदाराला दिले गेले. तसेच ज्‍या रुग्‍णांचे नातेवाईक नाहीत त्‍यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते परंतु त्‍या केंद्रांत सुविधा नाहीत. 

त्‍यामुळे वर्षभरात ९ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. मात्र, या केंद्रचालकांचे आणि येथील अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्‍याने याबाबत सुधारणा होत नाही', ही वस्तुस्थिती आरोग्‍यमंत्र्यांच्‍या लक्षात आणून दिल्‍यानंतर त्‍यांनी येथील वैद्यकीय अधीक्षकांची खरडपट्टी काढली. तसेच त्‍यांनी यावेळी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्‍याचेही आदेश दिले.

आरोग्‍यमंत्री स्‍वच्‍छतेवर नाराज
आबिटकर यांनी सकाळी औंध जिल्‍हा रुग्‍णालयाला अचानक भेट दिली. त्‍यानंतर त्‍यांनी मनोरुग्‍णालयातील स्‍वयंपाक गृह, महिला व पुरुष मनोरुग्‍ण कक्ष, त्‍यांचे स्‍वच्‍छतागृह यांची पाहणी केली असता त्‍यांनी हे स्‍वच्‍छतागृहांच्‍या व एकंदरीत स्‍वच्‍छतेबाबत नाराजी व्‍यक्‍त केली.

मनोरुग्‍णालयात दाखल झालेल्‍या रुग्‍णांना त्‍यांची समस्‍या सांगता येत नाही. परंतु, त्‍यांची काळजी घेणे, उपचार करणे हे येथील अधिकाऱ्यांचे काम आहे. जर स्‍वच्‍छता कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळत नसेल तर येथील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढायला हवी. तसे न झाल्‍यास आरोग्‍य खात्‍याकडून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्‍यात येईल.

- प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.