सांगली :- एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला आहे. गौरव हेमंत कुलकर्णी (वय- २०, रा- गणेश भाजी मंडई , इस्लामपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवार (दि.२७) रात्री साडेदहा
ते अकरा वाजताच्या दरम्यान यल्लमा चौकात घडली. याप्रकरणी अट्टल गुंड व
यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सौरभ सुशील पाटील (रा.
इस्लामपूर), जहांगीर मुजावर (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) या दोघांसह आणखी
एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामपूर पोलिसांनी काल रात्री या
दोघांना ताब्यात घेतले असून तिसरा हल्लेखोर फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव कुलकर्णी याने सौरभ पाटील याच्याकडे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात रागाने बघितल्याचे निमित्त झाले. यात रागाच्या भरात सौरभ याने त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना घेऊन गौरव कुलकर्णी याचा चाकूने भोसकून खून केला. सोमवारी रात्री उशिरा यल्लमा चौकात ही घटना घडली.
गौरव हा व्यवसायाने फोटोग्राफर होता. तर, संशयित सौरभ याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी आपली यंत्रणा तात्काळ सक्रिय करत या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. सौरभ पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर होता. दरम्यान, त्याने हा आणखी एक कारनामा केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.