पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी धोडी यांचा सर्वत्र शोध
घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नाहीये. अशोक
धोडी अचानक गायब झाल्याने स्थानिकांकडून याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.
त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
अशोक धोडी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम पाहिलं होतं. ते मागील 8 दिवसा पासून बेपत्ता आहेत. धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. 20 जानेवारी रोजी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून डहाणूहून घरी येत असल्याचं सांगितलं होतं. यांनतर त्यांचा अचानक फोन बंद झाला. यानंतर धोडी कुणाच्याच संपर्कात नाहीयेत. ते कारसह बेपत्ता झाले आहेत.
धोडी अशाप्रकारे अचानक गायब झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास केला जात नसल्याचा आरोप धोडी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात चकरा मारल्या, पण पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शिवाय अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशयही धोडी कुटुंबाकडून व्यक्त केला जातोय.पोलिसांनी धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, धोडी यांच्या गाडीच्या काचा वेवजी डोंगरीजवळ आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याचे विविध अर्थ काढले जात आहे. या घटनेबाबत अशोक धोडी यांच्या पत्नीनेही प्रतिक्रिया दिली आहे. घटनेच्या दिवशी २० तारखेला अशोक धोडी यांनी फोन केला होता. मी घरी येत आहे, असं फोनवरून सांगितलं होतं. मात्र त्यानंतर फोन आलाच नाहीये. आता त्यांचा फोन बंद आहे. माझ्या नवऱ्याचं अपहरण झालंय, अशी मला खात्री आहे. पोलिसांनी आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी माझी नम्र विनंती आहे, असं धोडी यांच्या पत्नीने म्हटलं आहे. अशोक धोडी हे महाराष्ट्र-गुजरात सीमावादाचा सातत्याने पाठपुरावा करायचे, त्यांच्या अपहरणामागे हे राजकीय कारण तर नाही ना? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.