सांगली : सांगली-मिरज शहरांसह ग्रामीण भागात घरफोड्या करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले. जितेंद्र ऊर्फ जिज्या महिमान्या काळे (वय ३०, सावळी), तायल ऊर्फ लेंग्या त्रिशा काळे (२०, ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा) अशी त्या सराईतांची नावे आहेत. त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आणून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, टोळीतील दोघे पसार असून बारूद अजित पवार (सावळी), बाजीगर वर्धन काळे (टाकळी) अशी त्यांची नावे आहेत.
घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाखालील पथक नियुक्त करण्यात आले आहे. सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी पथकातील कर्मचारी संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, शशिकांत शिंदे यांना रेकॉर्डवरील चोरटा जितेंद्र काळे व तायल काळे हे दोघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी तासगाव फाटा, मालगाव रस्ता येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. तेव्हा नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोघेजण आले.दोघांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. तेव्हा दुचाकीच्या पिशवीत सोन्याचांदीचे दागिने मिळून आले. चौकशी केल्यानंतर जितेंद्र पवार याने साथीदार तायल काळे, बारूद पवार, बाजीगर काळे यांच्या मदतीने टाकळी येथील मंदिराजवळील घरात, बेडग कालव्याजवळ, शिवाजी स्टेडियमजवळील घरात, कुपवाड येथील मंदिराजवळील घरात, भोसे येथील यल्लमा मंदिरात तसेच टाकळी येथील मंदिराजवळील घरासमोरून दुचाकी चोरी केल्याचे, तसेच इतर ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. चौकशीत आठ ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी ७ लाख ५ हजारांचे सोन्याचे दागिने, एक लाख ६ हजार रुपयांचे ११ मोबाईल, ४० हजार रूपयाची दुचाकी असा ८ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबीतील सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, अतुल माने, बसवराज शिरगुप्पी, गुंडोपंत दोरकर, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते, अभिजित माळकर, सोमनाथ पतंगे, 'सायबर'चे कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे, करण परदेशी, अजय पाटील यांनी ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.