पतौडी कुटुंबाचा नवाब सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्याची सगळीकडं चर्चा होत आहे. त्याचवेळी सैफच्या कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी उघड झालीय.
पतौडी कुटुंबाचे भोपाळमधील वारसा हक्काने आलेल्या संपत्तीवरील स्टे 2015 साली समाप्त झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची जवळपास 15 हजार कोटींची संपत्ती सरकारजमा होऊ शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं पतौडी परिवाराला त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिली होती. पण, अद्याप त्यांच्याकडून कोणताही दावा करण्यात आलेला नाही.
काय आहे प्रकरण?
हा संपूर्ण वाद शत्रू संपत्ती अधिनियम 1968 नुसार सुरु आहे. भारताची फाळणी झाल्यानंतर जी कुटुंब त्यांची संपत्ती सोडून पाकिस्तानात निघून गेली त्याबाबतचा हा नियम आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं 2015 सालीच या प्रकरणात बाजू मांडण्याचे आदेश पतौडी परिवाराला दिले होते. अभिनेता सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहीण सोहा अली खान आणि सबा अली खान यांना हा आदेश देण्यात आला होता. त्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण, अजूनही पतौडी परिवाराकडून कुणीही त्यांचा दावा सादर केलेला नाही.
नियम काय सांगतो?
शत्रू संपत्ती अधिनियम 1968 साली बनवण्यात आले. त्यानुसार पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांनी भारतामध्ये सोडलेली संपत्ती सरकारच्या ताब्यात जाते. या कायद्यानुसार या संपत्तीवर अन्य कुणी दावा करु शकत नाही. भोपाळमध्ये कोहेफिजा ते चिकलोद पर्यंत पतौडी परिवाराची जवळपास 100 एकर संपत्ती आहे. या जमिनीवर जवळपास दीड लाख लोकं राहात आहेत.
भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितले?
भोपाळचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी याबाबत सांगितलं की, 'कोर्टानं दिलेल्या आदेशाचं परीक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणात पहिल्यांदा काय निर्णय देण्यात आला होता आणि आता काय निर्णय दिलाय हे आम्ही पाहात आहोत. कायदेशीर सल्ल्यानुसारच आमचं काम सुरु आहे. या प्रकरणात कोणतंही मत प्रदर्शित करणे सध्या घाईचे ठरेल. '
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.