पुणे : धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होत आहे म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. गुरुवारी, पुण्यात, सहजीवन व्याख्यानमालेत 'विश्वगुरु भारत' या विषयावर बोलताना सरसंघचालकांनी हे वक्तव्य केले.
इतिहास दडवून ठेवण्याचा प्रयत्न
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुढे म्हटले की, 'भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही.लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोहन भागवत यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास 'विश्वगुरू भारत' ही केवळ घोषणा किंवा स्वप्न राहणार नाही, तर येत्या 20 वर्षांत भारत विश्वगुरूपदाला पोहोचलेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय प्राचीन, सनातन हिंदू राष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणून जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून राष्ट्रनिर्मिती झाली आहे. हा इतिहास कोणी तरी फायद्यासाठी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आजही दडविला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरसंघचालकांनी पुढे म्हटले की, देशाची परंपरा शाश्वत आहे. आमचेच खरे असे म्हणणारे आम्ही नाही. तसेच, आम्ही सर्वांविषयी श्रद्धा ठेवणारे आहोत. मात्र, आमच्या देवतांवर आक्रमण करून, अरेरावी करून कोणी मतांतर करणार असेल, तर ते चालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. बाहेरून आलेले काही लोक वर्चस्ववादासाठी आग्रही आहेत. मात्र, स्वतंत्र देशात राहायचे असताना वर्चस्ववादाची भाषा कशासाठी हवी असा प्रश्नही त्यांनी केला.
म्हणून कोणी हिंदूचा नेता नाही...
लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य असल्याची स्पष्टोक्ती करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, 'धर्म हा प्राचीन असून, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होते आहे, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही असे म्हटले.
राज्यघटनेचे आचारण महत्त्वाचे...
सरसंघचालकांनी पुढे म्हटले की, राज्यघटनेला धरून प्रामाणिकपणे वाटचाल करावी लागेल. राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचारण केले पाहिजे. या कर्तव्यांची समाजात आणि कुटुंबातही चर्चा व्हावी, असेही डॉ. भागवत यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.