नागपूर : नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर 'खासगी सचिवां'नी पुन्हा एकदा नव्या मंत्र्यांकडे 'फिल्डिंग' लावली आहे. त्यामुळे नागपूर येथील विधानभवन परिसरात अशा अधिकाऱ्यांची वर्दळ वाढली आहे.
एकेका मंत्र्यांकडे २० ते २५ अर्ज आले आहेत. काहींनी तर मंत्र्यांचे सर्व कार्यालय चालविण्याची खुली 'ऑफर' दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असा प्रकार पहिल्यांदाच मंत्री झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबाबत सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपने मात्र त्यांच्या मंत्र्यांना स्वीय सहाय्यक देण्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण केली आहे.
राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात चलती आहे ती मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांची. हे स्वीय सहाय्यक हे 'वर्ग एक' दर्जाचे असून महसूल किंवा पशुसंवर्धन सेवेतील आहेत. या दोनच विभागांचे मोठे प्राबल्य असल्याने इतर विभागांतून स्वीय सहाय्यक होणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. सहजासहजी येथे कोणाही नवख्या अधिकाऱ्याला प्रवेश दिला जात नाही. आता नवीनच मंत्रिमंडळ स्थापन झाल्याने जुन्यांसह नवीन अधिकारीदेखील प्रयत्नशील आहेत.
स्वीय सहाय्यक म्हणून जाताना आता एकच अधिकारी जात नाही. तर त्या अधिकाऱ्यासोबत एक टीमच कार्यरत राहते. यात एक स्वीय सहाय्यक, मंत्र्यांकढील खात्यांचा विचार करून पाच ते सहा विशेष कार्य अधिकारी, लिपिक, शिपाई, पोलिस असा २० पदांचा कोटा कॅबिनेट मंत्र्यांना उपलब्ध होतो. तर राज्य मंत्र्यांकडे १५ कर्मचाऱ्यांचा राबता असतो. याशिवाय खासगी कर्मचाऱ्यांची संख्यादेखील बरीच असते. या सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांची 'रेडिमेड टीम' एकत्र घेण्याची ऑफरच आता मंत्र्यांना दिली जात आहे.मंत्र्यांकडे वर्णी लागावी म्हणून अनेक इच्छुकांनी तर गाववाले, पक्ष, जात, आजी-माजी पदाधिकारी, नातेवाईक, पूर्वीचा अनुभव आणि त्या काळात केलेल्या 'उल्लेखनीय' कामाचा आधार घेत, आपले नाव स्वीय सहाय्यक पदासाठी रेटले असल्याचे दिसत आहे. ज्यांचे मंत्रिपद हुकले आहे, त्यांच्यामार्फत किमान स्वीय सहाय्यक तरी घेतला जावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भाजपचा राहणार 'वॉच'
एकदा संधी मिळाली की पाच वर्षे राज्य, अशी स्वीय सहाय्यकांची भावना आहे. मात्र २०१४ मध्ये ज्याप्रमाणे ठाण मांडलेल्या स्वीय सहाय्यकाना मंत्रालयाबाहेरचा रस्ता दाखवला, तसेच आताही वादग्रस्त अधिकाऱ्यांवर भाजप कडून 'वॉच' ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.