आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : शासनाचा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांवर जोर आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला टार्गेटही निश्चित करून दिले गेले आहे. मात्र, त्या तुलनेत पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.
त्याचाच प्रत्यय कळमनुरी तालुक्याच्या बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आला. येथे ४३ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, पुरेसे काॅट उपलब्ध नसल्याने या महिलांना शस्त्रक्रियेनंतर ऐन थंडीत जमिनीवरच झोपविण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने आखाडा बाळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारण्याची तयारी चालविली आहे.
आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. ४३ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवरच झोपविल्याने महिलांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली.
आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुटुंबकल्याण शिबिरात महिलांना कॉट दिले होते. त्यानंतर शुक्रवारीही कुटुंबकल्याण शिबीर घेण्यात आले; परंतु कॉट उपलब्ध न झाल्यामुळे गादी, चादर व थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेटही दिले होते. कॉट का उपलब्ध झाले नाहीत, याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल.-डॉ. कैलास शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.