कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची काय हालत होईल, याची कल्पनाच न केलेली बरी! अलमट्टीची उंची वाढविली आणि भविष्यात पुन्हा विनाशकारी महापूर आला, तर जवळपास निम्मे कोल्हापूर शहर आणि संपूर्ण सांगली शहर महापुराच्या पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीकाठी असलेली छोटी-मोठी गावे तर उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2019 आणि 2021 मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुराची झळ कोल्हापूर आणि सांगली शहराने चांगलीच अनुभवली आहे. या महापुरात कोल्हापूर शहराचा जवळपास सर्व उत्तर, पूर्व भाग पाण्याखाली गेला होता. अशावेळी अलमट्टी धरणाची उंची आणखी वाढवून महापुराची पाणी पातळी आणखी 15 फुटांनी वाढली तर शहराची काय हालत होईल याचा अंदाज येऊ शकतो. जिल्हाधिकारी कार्यालय आणि व्हिनस कॉर्नरवर 18 ते 25 फूट पाणी येणार असेल, तर महापूर शहरातील कोणकोणत्या भागाला विळखा घालेल याचा अंदाज येण्यास हरकत नाही. कोल्हापुरातील सर्वाधिक उंचवट्यावर असलेला शहराचा काही भाग सोडला तर निम्म्याहून अधिक कोल्हापूर बुडून गेलेले असेल.
सांगलीची स्थिती !
सांगली शहराची दयनीय अवस्था तर त्याहून भयावह होईल. अवघी 30 ते 35 फूट पाणीपातळी असताना बाधित होणाऱ्या दत्तनगर, काकानगरची स्थिती पाणीपातळी 72 फूट झाल्यावर काय होईल? मध्यवर्ती बसस्थानकात मागच्या महापुराच्यावेळी चार ते पाच फूट पाणी होते. आता तिथली पाणीपातळी 23 ते 24 फूट झाली तर शहरातील एक तरी नागरी वस्ती महापुराच्या तावडीतून सुटेल काय? महापूर पार मार्केट यार्डात घुसून पोलिस मुख्यालयाला आणि विश्रामबागलाही विळखा घालू शकेल. अशा परिस्थितीत सांगली शहराचे अस्तित्व राहील काय?
नदीकाठच्या गावांचे काय?
पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीकाठी लहान-मोठी शेकडो गावे आहेत. अलमट्टीमुळे महापूर येऊ लागल्यापासून दरवर्षी ही गावे पूर-महापुराने बाधित होताना दिसतात. अशावेळी जर अलमट्टीची उंची आणखी 17 फुटांनी वाढली तर या गावांचे करायचे काय?
...तर कोल्हापुरातील या वसाहती जाणार पाण्यात
2019 आणि 2021 मध्ये पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी राजाराम बंधाऱ्याजवळ सर्वोच्च पाणी पातळी 56.3 फूट इतकी होती. अलमट्टीची उंची वाढल्यावर महापूर आल्यास ही पाणी पातळी किमान 71 फूट होईल. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराच्या कोणत्या भागात किती फूट पाणी असेल त्याची ही झलक... जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर 18 ते 19 फूट बसंत-बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग: 21 ते 22 फूट कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्त्यावर : 22 ते 23 फूट महाराणा प्रताप हायस्कूल ते दुधाळी ग्राऊंड 22 ते 23 फूट मुक्त सैनिक वसाहत ते कदमवाडी गणेश पार्क: 23 ते 24 फूट पंचगंगा तालीम ते व्हिनस कॉर्नर रस्ता परिसर 24 ते 25 फूट महावीर कॉलेज, सनसिटी ते ड्रीमपार्क परिसर : 25 ते 26 फूट मेडिकल कॉलेज बावडा ते जयंती नाला परिसर : 25 ते 26 फूट रिलायन्स मॉल, कुंभार गल्ली ते कोंडा ओळ 27 ते 28 फूट सुतारवाडा ते जुना शिये नाका परिसर 29 ते 31 फूट
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.