बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने २४ पानी सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळ केल्याचा आरोप केला आहे.
पत्नीने आपल्यावर अनेक खटले दाखल केले आहेत आणि आता ती ३ कोटी रुपयांची मागणी करत आहे, असे आरोप केला आहे. अतुल सुभाष असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये डीजीएम म्हणून कार्यरत होते. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, ही घटना मंजुनाथ लेआउट भागात घडली, जे मराठाहल्ली पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे. तसेच, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अतुल सुभाष आणि पत्नी यांच्यात वाद होते. पत्नीने त्यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात गुन्हाही दाखल केला होता, असे प्राथमिक तपासात असे समोर आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पोलिसांना फोनद्वारे आत्महत्येची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घर आतून बंद असल्याचे दिसले. स्थानिक लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी बेडरूममधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती उत्तर प्रदेशात राहणाऱ्या अतुल सुभाष यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्यानंतर त्यांचे भाऊ विकास कुमार घटनास्थळी पोहोचले.
विकास कुमार यांनी सांगितले की, अतुल सुभाष यांना त्यांची पत्नी, सासू आणि मेहुणा यांनी खोट्या खटल्यात अडकवले आणि या खटल्यांसाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे अतुल सुभाष यांना प्रचंड नैराश्य आले होते, त्यामुळे त्यांनी स्वत:चा जीव घेतला. दरम्यान, अतुल सुभाष यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मराठाहल्ली पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्याच्या कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
अतुल सुभाष यांनी आपली सुसाईड नोट अनेक लोकांना ईमेलद्वारे पाठवली आणि ती एका एनजीओच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केली, या ग्रुपशी तो संबंधित होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी मेसेजमध्ये लिहिले की, "सर, हा मेसेज निरोप देण्यासाठी आहे. शक्य असेल तर कृपया माझ्या कुटुंबाला मदत करा. आतापर्यंतच्या तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे खूप खूप आभार." यामध्ये त्यांनी केलेल्या व्हिडीओची लिंक आणि सुसाईड नोटही पाठवली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.