Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेकरीतून शॉपिंग केली, घरी पोहोचला अन् जागेवरच उडाला, पुण्याच्या पोलिसासोबत कांड झाला!

बेकरीतून शॉपिंग केली, घरी पोहोचला अन् जागेवरच उडाला, पुण्याच्या पोलिसासोबत कांड झाला!
 
 
पुणे : मागच्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जवळपास रोजच अनेक जण या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. ऑनलाईन फसवणुकीसाठी गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत.

सायबर सेल आणि पोलीस नागरिकांना अशाप्रकारे फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी वारंवार सतर्क करत आहेत, पण पुण्यातला एक पोलीसच ऑनलाईन फसवणुकीची शिकार ठरला आहे. क्युआर कोड स्कॅन करून या पोलिसाच्या खात्यातून 2.3 लाख रुपये गेले आहेत.

पुण्याच्या सासवड भागात राहणारी ही व्यक्ती पुणे ग्रामीण विभागातील पोलीस कर्मचारी आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सासवडच्या बेकरीमध्ये ऑनलाईन पेमेंट करत असताना या फसवणुकीला सुरूवात झाली. सासवडच्या बेकरीमधून वस्तू विकत घेतल्यानंतर पोलिसाने ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्युआर कोडची मागणी केली. यानंतर काही वेळाने पोलिसाच्या बँक खात्यातून 18,755 रुपये गेले.
बँकेतून पैसे गेल्याचं लक्षात येताच पोलिसाने त्याची इतर बँकांमधली खातीही चेक केली, तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याच्या सॅलरी अकाऊंटमधूनही 12,250 रुपये काढले गेले होते आणि त्या खात्यात फक्त 50 रुपये होते. हा धक्क्यातून पोलीस सावरत नाही तोच पोलिसाच्या पायाखालची जमिनच सरकली, कारण त्याच्या मोबाईलवर एक वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आला. हा ओटीपी त्याने कुणाबरोबरही शेअर केला नाही, तरीही त्याच्या गोल्ड लोन खात्यातून 1.9 लाख रुपये गेले.

फसवणूक करणारे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलच्या क्रेडिट कार्डवरून 14 हजारांचे दोन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने पोलिसाने तत्परता दाखवत त्याची बँक खाती आणि क्रेडिट कार्ड फ्रीज केली होती.

याप्रकरणी तपास सुरू असून पोलीस कॉन्स्टेबलच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका एपीके फाईलच्या माध्यमातून गुन्हेगारांनी मोबाईलमधली माहिती आणि डेटा चोरला. पोलीस कॉन्स्टेबलने अनावधानाने एखाद्या लिंकवर क्लिक केल्यामुळे गुन्हेगारांना त्याच्या मोबाईलचा ऍक्सेस मिळाला, आणि त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलचं बँक अकाऊंट खाली केलं, असा संशय पोलिसांना आहे. सासवडच्या बेकरीमधल्या क्युआर कोडमधूनच पोलीस कॉन्स्टेबलच्या मोबाईलमध्ये एपीके फाईल डाऊनलोड झाली का? याचा तपासही पोलीस करत आहेत.
फसवणुकीपासून कशी काळजी घ्याल?

क्युआर कोडची नीट तपासणी करा

क्युआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्ही ज्याच्याकडून वस्तू घेत आहात तो दुकानदार विश्वासू असल्याची खात्री करून घ्या. अनधिकृत आणि संशयास्पद क्युआर कोडवर स्कॅन करू नका.

दुकानदाराचं नाव पाहा
क्युआर कोड स्कॅन करताना दुकानदाराचं नाव पाहा आणि त्यानंतरच पेमेंट करा.
संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका

टेक्स्ट मेसेज, ईमेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये फसवणुकीसाठी तयार केले गेलेले ऍप आपोआप इन्सटॉल होऊ शकतात, ज्यातून पुढे तुमचं बँक अकाऊंट खाली व्हायचा धोका असतो.

अधिकृत ऍपचा वापर करा
ऑनलाईन पेमेंट करताना नेहमी अधिकृत ऍपचा वापर करा. नेहमी गुगल स्टोअर किंवा ऍपल ऍप स्टोअरवरूनच ऍप डाऊनलोड करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.