जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'सीबीएसई पॅटर्न'
छत्रपती संभाजीनगर : सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
'सीबीएसई' पॅटर्नप्रमाणेच राज्य बोर्डाच्या शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनऐवजी १ एप्रिलपासून करण्याचा प्रस्ताव सुकाणू समितीने शासनाला दिला. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे.
काही वर्षांत पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी केंद्रीय शाळांना महत्त्व दिले. मोठ्या प्रमाणात पालक आपल्या पाल्यांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांत प्रवेश मिळवून देत आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रवेशांचे प्रमाण कमी झाले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली.
ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी २०२५-२६ पासून सुरू होणार आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलनुसार नव्याने भरती करण्यात आलेल्या १२०० शिक्षकांना सीबीएसईप्रमाणे इंग्रजी व गणित विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रस्ताव देणाऱ्यांना प्राधान्य
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २,१०६ शाळा आहेत. त्यामध्ये तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. ज्या शाळा प्रस्ताव दाखल करतील, त्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा सीबीएसई पॅटर्न राबवण्यास संमती देण्यात येणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.
आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी पालक सीबीएससी बोर्डाच्या शाळांना पसंती देतात. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यानुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला. पवित्र पोर्टलनुसार नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या १,२०० शिक्षकांना इंग्रजी आणि गणित विषयाचे सीबीएसई प्रमाणे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.