''माझे जुने सहकारी दिसतच नाही, वॉशिंग मशीनमध्ये जाऊन...'', प्रियांका गांधींचा हसत हसत भाजप खासदाराला टोला
काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांच आज लोकसभेत पहिलंच वादळी भाषण पार पडलं आहे.या पहिल्याच भाषणात प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. इतकंच नाही तर प्रियांका गांधी यांनी
त्यांचे जुने सहकारी असलेले व पुर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि सध्या
भाजपात असलेल्या खासदार ज्योतिराज सिंधिया यांना सणसणीत टोला लगावला आहे.
खरं तर भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेतील खास चर्चेत प्रियांका गांधी सहभागी झाल्या होत्या.यावेळी बोलताना त्यांनी ज्योतिराज सिंधिया यांच्यावर निषाणा साधला. सर्व जनतेला माहितीय याच्याकडे (भाजपकडे) वॉशिंग मशीन आहे. जो इथून तिकडे (भाजपमध्ये) गेल्यावर स्वच्छ प्रतिमेचा होऊन जातो. त्यामुळे या ठिकाणी डाग त्या ठिकाणी स्वच्छता दिसते. माझे अनेक असे जुने सहकारी आहेत, जे आधी आमच्यासोबत होते आणि आता त्याच्याकडे (भाजपमध्ये) गेले आहेत. मला सध्या ते दिसतही नाहीत, कदाचित वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वच्छ झाले असावेत, असा जोरदार टोला प्रियांका गांधी यांनी हसत हसत नाव न घेता ज्योतिराज सिंधिया यांना लगावला आहे.
दरम्यान प्रियांका गांधी यांनी ज्यावेळेस राजकारणात प्रवेश केला होता. या प्रवेशाच्या काही महिन्यानंतर त्यांच्यावर उत्तरप्रदेशच्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळी प्रियांका गांधी यांची पुर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिराज सिंधिया देखील होते.या दोन्ही नेत्यांनीं त्यावेळेस उत्तरप्रदेशच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला होता.प्रियांका गांधी यांनी यावेळी भारतीय संविधानाचे महत्व देशातील जनतेसाठी नेमके काय आहे, हे विषद करताना त्यांनी मागील दोन वर्षांतील लोकांच्या घेतलेल्या गाठीभेटी, त्यांची न्यायासाठी सुरू असलेली लढाई आणि संविधानावरचा त्यांचा अढळ विश्वास अधोरेखित केला. त्यांचे संपूर्ण भाषण काँग्रेस सदस्य कानात प्राण आणून ऐकत होते. त्यांचे भाषण ऐकायला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विशेष उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.