Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कडेगावमध्ये वृद्धाला लुटणाऱ्या अमरावतीच्या तिघांना अटक पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

कडेगावमध्ये वृद्धाला लुटणाऱ्या अमरावतीच्या तिघांना अटक पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
 

सांगली :  कडेगाव येथे कपड्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने घुसून एका वृद्धाचे हात-पाय साडीने बांधून, चाकूचे धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठ्या चोरणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

प्रज्वल नरेश मातनकर (वय २०), अभिषेक सुधाकरराव बोडखे (वय २२), ओम प्रविणराव घाटोळे (वय १९, तिघेही रा. मोर्शी, जि. अमरावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २८ सप्टेंबर रोजी तिघे संशयित कडेगाव येथील शिवांश कलेक्शन या कापड दुकानात साडी घेण्याच्या बहाण्याने गेले होते. त्यावेळी त्यांनी दुकानातील नामदेव करडे यांचे हात-पाय साडीने बांधून त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठ्या जबरदस्तीने चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे विशेष पथक तयार केले होते. 

पथक चोरट्यांचा शोध घेत असताना ही चोरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील तरूणांनी केल्याची माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीसह तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने मोर्शी येथे सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी करडे यांनी पगाराचे पैसे न दिल्याने प्रज्वल मातनकर याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून कडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १.७५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कडेगावचे निरीक्षक संग्राम शेवाळे, एलसीबीचे उपनिरीक्षक कुमार पाटील, प्रविण जाधव, अरूण पाटील, संदीप पाटील, सूरज थोरात, संदीप जाधव, नरेंद्र यादव, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.