Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नव्या सरकारच्या शपथविधीत चोरट्यांची 'हात की सफाई'; १२ लाखांचा ऐवज लंपास

नव्या सरकारच्या शपथविधीत चोरट्यांची 'हात की सफाई'; १२ लाखांचा ऐवज लंपास
 

आझाद मैदान येथे पार पडलेल्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त अस्ताना देखील चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. शपथविधीसाठी आलेल्या १३ कार्यकर्त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकृतपणे चोरीची तक्रार दाखल केली आहे. त्यात काही महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
 
आझाद मैदान पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात १३ जणांनी दाखल केलेल्या तक्रारीत १२ लाख ४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून त्यात ११ सोनसाखळ्या आणि २ पर्स चोरीला गेल्याचे म्हटले आहे. ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात सायंकाळी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच देशभरातून महायुतीचे नेते, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ४ हजार मुंबई पोलिसांची फोज तैनात करण्यात आली होती. त्याचबरोबर एस. आर. पी. एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथक अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले होते. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त असताना देखील चोरट्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. शपथविधी सोहळा कार्यक्रम संपन्न होताच आझाद मैदान गेट क्रमांक २ मधून शपथविधी सोहळ्यासाठी आलेले कार्यकर्ते बाहेर पडत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत अनेकांच्या गळ्यावर हात फिरवून सोनसाखळ्या लांबवल्या.

गळ्यातील सोनसाखळी, पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच अनेकांनी आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन आपल्या तक्रारी दाखल केल्या. पोलिसांनी १३ जणांच्या चोरीच्या तक्रारी दाखल करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १३ जणांमध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे. चोरीला गेलेल्या सोनसाखळ्या आणि पर्स असे मिळून चोरट्यांनी जवळपास १२ लाख ४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शपथविधी सोहळा दरम्यान अनेकांचे मोबाईल फोन देखील गहाळ झाले असून पोलिसांनी मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल न करता केवळ गहाळ झाल्याचे प्रमाणपत्र देऊन तक्रारदारांची बोळवण करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.