राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येऊन तब्बल आठवडा उलटला तरीदेखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. निवडणुकीत भाजपनं तब्बल 137 जागांवर विजय मिळवला आहे, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, यावर कुठे शिक्कामोर्तब होणार तेवढ्यात राज्यात मराठा मुख्यमंत्री असावा, म्हणून पुन्हा एकदा अमित शहांनी शहानिशा केल्याची माहिती समोर आली. अशातच आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीखही ठरली आहे. तरी, नेमकं मुख्यमंत्री कोण? हे मात्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. पण, तसं असलं तरी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आधीच निश्चित असल्याचं मानलं जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार असल्याची घोषणा केली. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत मात्र सस्पेन्स कायम ठेवण्यात आला. अशातच आता अजितदादांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या सर्व राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
"भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री..."
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स संपवून टाकला आहे. अजित पवारांनी सांगितलं की, दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत भाजपचे मुख्यमंत्रिपद घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार म्हणाले की, "बैठकीत (महायुतीच्या नेत्यांची दिल्ली बैठक) महायुती भाजपचे मुख्यमंत्री आणि उर्वरित दोन पक्षांच्या उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करेल, असं ठरलं होतं. विलंब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जर तुम्हाला आठवत असेल तर 1999 मध्ये सरकार बनायला एक महिना लागला होता."
"मला जे काही सांगायचं ते मी त्या ठिकाणी सांगितलं आहे, विधानसभेचा निकाल विरोधकांच्या जिव्हारी लागला असून ते सहनच करू शकत नाहीत. त्यामुळे आता काढू लागलेत की, ईव्हीएममध्ये दोष आहे, मी आता आदरणीय बाबा आढावांना तेच सांगून आलो... हा निकाल विरोधात लागला तर यांनी मिरवणुका काढल्या असत्या... सुप्रीम कोर्टानं निकाल दिला, हे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही, त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे. पराभववाचं खापर ईव्हीएम आणि इतर योजनांवर फोडलं जातंय.", असंही यावेळी अजित पवार म्हणाले.नुकतंच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या हायकमांडवर टाकून मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृहखात्यासह आणखी अनेक खात्यांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे.
अंदाजे पाच तारखेला शपथविधी होईल आणि खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असेल, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. 132 जागा त्यांच्या तर मुख्यमंत्री त्यांचाच होईल ना, असंही ते म्हणाले. तसेच, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी गेले आहेत, त्यावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावरही त्यांनी भाष्य केलं. अजितदादा म्हणाले की, शनिवार-रविवार सुट्टी असल्यानं...फारसं काही काम नसल्यानं ते तिकडं गेलेत.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली
दरम्यान, महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ढासळल्याची बातमी समोर आली आहे. शिंदे यांना ताप आल्यामुळे त्यांच्या दरेगावातील घरी डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आलेलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथील दरा येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी मुक्कामी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.