भोर परिसरात राइस मिल सुरू दरवळू लागला इंद्रायणीचा सुगंध; यंदा उत्पादन कमी
भोर : भोर तालुक्यात खरीप हंगाम संपला असून, शेतकरी आपल्या वर्षभराचे प्रमुख पीक असलेले भातपीक कांडप करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे. गावोगावी असणाऱ्या राइस मिल सुरू झाल्या असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही राइस मिल मालकांकडून शेतकऱ्यांना भात वाहतूक मोफत करून पुन्हा घरपोच तांदूळ केला जात आहे. भात कांडपाला सध्या वेग आला असून, यावर्षीही तालुक्यात भाताच्या इंद्रायणी वाणाचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत कमी निघाले आहे. राइस मिल सुरू होताच इंद्रायणी तांदळाचा सुगंध सर्वत्र पसरला आहे.
भोर तालुका हा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला तालुका आहे. पावसाचे प्रमाण या वर्षी चांगले आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात झालेला अधिक पाऊस आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे भाताचे उत्पादन कमी निघाले असून तांदूळही कमी होणार आहे. यामुळे भाव वाढतील. तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७४०० हेक्टवर भाताची लागवड केली जाते. या प्रामुख्याने इंद्रायणी, रत्नागिरी २४, कोळंबा, आंबेमोहोर, बासमती, गंगा कावेरी, कर्जत १८४ अशा अनेक जातींची लागवड केली जाते.
भोरचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ सर्वत्र प्रसिद्ध आहे. तसेच येथील इंद्रायणी तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने येथील शेतकरी इंद्रायणी याच जातीच्या भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पन्न घेतात. सध्या सर्वत्र राइस मिल सुरू झाल्याने आपले साठवून ठेवलेले भात पीक कांडप करून आणण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. ग्रामीण भागात राइस मिलवाले शेतकऱ्यांना मोफत भात कांडप करून पुन्हा घरपोच तांदूळ देत आहेत. त्यामुळे घरी साठवलेले भात लवकरात लवकर कांडप करून आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.यामुळे राइस मिलवर भात भरडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी गर्दी करताना दिसत आहेत. भात भरडून तांदूळ तयार झाल्यावर शेतकरी तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणतात तर काही जण घरीच विकतात, हॉटेल व्यापारी यांना विकतात. सुमारे ५५ ते ६० रुपये प्रति किलो भाव आहे. मात्र, ग्रामीण भागातील गिरणी म्हणजे भात भरडण्याच्या हॉलरची जागा आता राइल मिलने घेतली आहे. यामुळे तांदूळ पॉलिश होतो आणि चवीत फरक पडत असल्याचे शेतकरी सांगतात. भात कांडप केल्यानंतरही यामधील निघणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग चांगला होत आहे.
५५ ते ६० रुपये प्रति किलो भाव
तालुक्यातील आंबवडे, कारी, निगुडघर नांदगाव, आंबेघर, खानापूर माळवाडी, बारे बु., टिटेघर, नांदगाव, नन्हे, भोलावडे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भात कांडप करण्यासाठी येत असून येथील राइस मिल मालकाकडून मोफत वाहतुकीसह भात कांडप करून देऊन घरपोच तांदूळ सेवा दिली जात आहे. सध्या बाजारात शेतकऱ्यांचा नवीन कांडप केलेला इंद्रायणी तांदूळ आला असून पंचावन्न ते साठ रुपये प्रति किलो भाव या तांदळाला मिळत असल्याचे शिद येथील शेतकरी शैलेश जाधव यांनी सांगितले.
कारी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची नवीन राइस मिल मशीनरी बसविली असून शेतकऱ्यांना तांदळाचा जादा उतारा मिळत आहे. आक्का तांदूळ तयार होती. आणि बाजारात याला अधिक मागणी आहे. हॉलर गिरणीप्रमाणे राइस मिलवरचा तुकडा असलेला तांदूळ आम्ही भरडून देतो. हभप बापू डेखे, राइस मिल चालक
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.