ताम्हिणी घाटात मोठा अपघात; प्रवाशांनी भरलेली बस उलटली, दोघांचा मृत्यू
ताम्हिणी घाटात प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ हा अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस अचानक उलटली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस उलटल्याने बसमध्ये आणि बसखाली काही प्रवाशी अडकले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. यासोबतच रेस्क्यू टीम, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बस उलटल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन जवळच असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या बसचा अपघात झाला आहे ती खाजगी ट्रॅव्हल्सची बस होती. ही बस पुण्याहून कोकणात निघालेली असताना शुक्रवारी (20 डिसेंबर) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमी प्रवाशांवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचं बोललं जात आहे. पोलीस तपासानंतर अपघातामागचे नेमके कारण स्पष्ट होईल. ताम्हिणी घाट हा धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या घाटातून जाताना वाहन चालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. घाटातील अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, खराब रस्ते, खराब हवामान आणि त्यासोबतच वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.