महावितरणने एक गुड न्यूज दिली आहे, ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024 नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत.
1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिकवेळा वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना लकी ड्रा व्दारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
ग्राहकांना देय रक्कमेवर 0. 25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट
ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे.
ग्राहकांना देय रक्कमेवर 0. 25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात 70 टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.
पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून 2025 या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रामध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
'हे' ग्राहक असतील बक्षिसपात्र
योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. वीज बिलाची किमान रक्कम 100 रुपये असणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम 10 रुपयांपेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.