लॉरी असोसिएशनच्या मागण्या धुडकावून लावत अदानी ग्रुपचा कागल येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नवीन वादग्रस्त सीमा तपासणी नाका आजपासून पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला. सध्या या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. दरम्यान, शुक्रवारनंतर (दि. 12) या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लॉरी असोसिएशनने दिला आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागलजवळील सीमा तपासणी नाका अनेक कारणांनी वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. 2019 पासून हा तपासणी नाका सुरू होणार होता; पण या नाक्याच्या बांधकामाची रक्कम न मिळाल्याने नाका सुरू होऊ नये यासाठी या प्रकल्पाचे ठेकेदार थेट न्यायालयात गेले. पण अदानी समूहाकडून निर्मितीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून सीमा तपासणर्णी नाका चालू करण्याच्या हालचार्ली सुरू होत्या. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येताच राज्यातील अदानी ग्रुपचे असे नाके सुरू करण्याच्या हालचाली पूर्णत्वास येताना आता दिसून येत आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉरी असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनने मालवाहतूक करणाऱ्या मालवाहू गाड्यांच्या वजनात तफावत आणि वाढीव कर आकारणी होणार असल्याने याला विरोध दर्शवला आहे. काल सोमवारी लॉरी असोसिएशनने मालवाहतूक वाहनांसह सीमा तपासणी नाक्यावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. पण उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केल्याने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर आज सकाळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर हा सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.