शेरीनाला प्रस्तावावर प्रशासकीय पातळीवरूनच पाठपुरावा करावा पृथ्वीराज पाटील यांची आयुक्त शुभम गुप्तांकडे आग्रही मागणी
सांगली : गेल्या चार दशकांपासून कृष्णा नदीच्या आणि पर्यायी सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करणाऱ्या शेरीनाला प्रकरणी ९३ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे. त्याचा पाठपुरावा महापालिका प्रशासनाने स्वतः करावा. सांगलीचे आमदार हा विषय रेटू शकत नाही, हे दहा वर्षात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेलाच जबाबदार धरू, अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे मांडली.
पृथ्वीराज पाटील यांनी आज आयुक्त श्री. गुप्ता यांची भेट घेत कृष्णा नदीचे प्रदूषण, सांगलीचा पाणीपुरवठा, शेरीनाल्याचे पंप, धुळगाव योजना आणि नवीन शेरीनाला प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली. आयुक्त श्री. गुप्ता यांनी महापालिकेकडून शेरीनाला सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी 93 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असल्याचे सांगितले. श्री. पाटील यांनी या प्रस्तावाची आम्हाला कल्पना आहे, मात्र तो मंजूर व्हावा, यासाठी काय प्रयत्न होताना दिसत नाहीत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गेली दहा वर्षे या शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांना हा प्रश्न महत्वाचा वाटत नसेल तर सांगलीकरांचे दुर्दैव आहे. हा प्रश्न महापालिका प्रशासनाने हातात घ्यावा. त्यांनीच पाठपुरावा करून प्रकल्प मंजुरी करून घ्यावी. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयुक्त श्री. गुप्ता यांनी राज्यात मंत्रीमंडळ विस्तारानंतर याबाबत तातडीने हालचाली करू, असे आश्वासन दिले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, की आमदार सुधीरदादा गाडगीळ दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. चार हजार कोटीचा निधी आणल्याचे फलक त्यांनी लावले, मग त्यात शेरीनाला का नाही. अनावश्यक पूल, चार रस्ते करून विकासाचा गप्पा मारण्यापेक्षा त्यांनी सांगलीकरांच्या आरोग्याशी निगडीत शेरीनाल्याला प्राधान्य द्यायले हवे होते. ते घडले नाही. महायुती सरकारने प्राधान्यक्रम ठरवावेत. या शहराची पहिली गरज शुद्ध पाण्याची आहे. त्यासाठी शेरीनाल्याचा 93 कोटीचा प्रकल्प मंजूर करावा. ही जबाबदारी आता आयुक्तांची असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.