सांगली : उसने घेतलेले दोन लाख रूपये परत मागितल्यानंतर एकाचा खून केल्याप्रकरणी जत येथील तरूणाला दोषी धरत आजन्म सश्रम कारावास, पाच हजारांचा दंड, एक महिना सश्रम कारावास, दंड न दिल्यास दोन महीने कारावासाची शिक्षा सांगलीतील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहीले.
सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. विश्रामबाग, सांगली, मूळ रा. जत) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपी सरफराज सांगलीत विश्रामबाग येथे रहात होता. त्यावेळी २०१७ मध्ये त्याने प्रशांत सूर्यकांत पाटील यांच्याकडून दोन लाख रूपये उसने घेतले होते. त्यावेळी ती रक्कम तीन महिन्यात परत करण्याचे ठरले होते. मात्र सरफराजने ती रक्कम वेळेत परत दिली नाही. तसेच रक्कम देण्यास तो टाळाटाळ करत होता. दि. ६ डिसेंबर २०१८ रोजी प्रशांत पाटील आणि त्यांच्या पत्नीने त्याच्या घरी जाऊन पैशांची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. नंतर चिडलेल्या सरफराजने पाटील यांच्या डोक्यात कोयता आणि रॉडने गंभीर मारहाण केली. त्यात प्रशांत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी राजलक्ष्मी पाटील यांनी विश्रामाबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर सरफराज याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एम. पी. सोनवलकर यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपी पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. यातील फिर्यादी राजलक्ष्मी पाटील यांची प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष महत्वाची ठरली. त्यावर जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. शर्मा यांनी सरफराज याला दोषी धरून शिक्षा सुनावली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.