सांगली : सराईतांच्या यादीवरील गुन्हेगाराच्या खुन प्रकरणातून माजी नगरसेवक राजू गवळी याची निर्दोष मुक्तत्ता झाली.
शनिवारी सकाळी तो कारागृहातून बाहेर येणार असल्यामुळे शंभरहून अधिक कार्यकर्ते गर्दी करून स्वागताला जमले होते. याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लाठीमार करताच अनेकांची पळताभुई थोडी झाली. गवळी याला पोलिसांनी समज दिली. त्यानंतर बंदोबस्तात त्याला हनुमाननगर येथील घरी सोडले.
सांगलीतील सराईत गुन्हेगार गणेश माळगे याचा २०१८ मध्ये खून झाला होता. माजी नगरसेवक गवळी याचा भाचा धनंजय गवळी याच्या डी गँगने हा खून केल्याच्या आरोपाखाली टोळीला अटक करण्यात आली. या खुनाचा नियोजित कट केल्याचा ठपका ठेवत गवळीलाही अटक केली. त्यानंतर आठ जणांच्या टोळीला ‘मोका’ लावण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात या खून खटल्याची सुनावणी सुरू होती. परंतू सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात फिर्यादीसह काहीजण फितूर झाल्याने माजी नगरसेवक गवळी याची शुक्रवारी निर्दोष मुक्तत्ता करण्यात आली.
शनिवारी सकाळी जिल्हा कारागृहातून गवळी याला बाहेर सोडणार असल्यामुळे त्याच्या समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. काहीजण जल्लोष करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलिस तेथे धावले. पोलिसांनी विचारणा केल्यानंतर काहींनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काठ्या उगारून पोलिसांनी झोडपून काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे अनेकांनी राजवाडा चौकातून वाट दिसेल तिकडे समर्थक धावत सुटले.काहींना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. हा प्रकार पाहून राजवाडा चौकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.या प्रकारानंतर पोलिसांनी कारागृहात जाऊन राजू गवळी याला समज दिली. तो विश्रामबाग विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्यामुळे त्यांना बोलवून घेतले. विश्रामबाग पोलिसांबरोबर गवळी याला कारागृह परिसरातून सोडून दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.