भिलवडीतील दुचाकी चोरट्याला अटक, २१ वाहने जप्त
६.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सांगली एलसीबी, भिलवडी पोलिसांची कारवाई
सांगली :
सांगली जिल्ह्यातील विविध शहरे, गावांमधून दुचाकी चोरणाऱ्या भिलवडी (ता. पलूस) येथील तरूणाला अटक करण्यात आली. जिल्ह्यातील २१ गुन्हे उघडकीस आणत ६.६३ लाखांच्या २१ चोरीच्या दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली एलसीबी आणि भिलवडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
सुदिप अशोक चौगुले (वय ३७, रा. पाटील गल्ली, भिलवडी, ता. पलूस) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने अधीक्षक शिंदे यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांना दिल्या होत्या. निरीक्षक शिंदे यांनी यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाला सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावरील सिदिधविनायक चौक येथे एक तरूण विना क्रमांकाची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. संशयित तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती माळवाडी येथून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर जिल्ह्यातील विविध शहरे, गावांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त करून त्याला अटक करून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भिलवडी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीच्या आणखी १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडून एकूण २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, भिलवडीचे सहायक निरीक्षक भगवान पालवे, उपनिरीक्षक कुमार पाटील, नागेश कांबळे, संदीप पाटील, अतुल माने, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.