सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार अशा चर्चा सुरू आहेत.
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. मात्र हे सेवानिवृत्तीचे वय आणखी वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या. दरम्यान आता याच संदर्भात सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती हाती आली आहे.
सरकार खरंच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत विचार करत आहे का याबाबत केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली आहे. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सुधारण्याच्या योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सध्या अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही असे म्हटले आहे.बुधवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. कामाच्या गरजेच्या आधारे नागरी सेवांमध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार धोरण तयार करणे आणि इतर उपाययोजना तयार करण्यात गुंतले आहे, असेही सिंह म्हणाले. सिंह म्हणाले की, वेळोवेळी केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांना रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ते म्हणाले की, केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, विभाग, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSU), स्वायत्त संस्था आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांमध्ये मिशन मोडमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करत आहे, ज्यामुळे तरुणांना प्रशासकीय सेवा मिळू शकतात.
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करण्याबाबत सरकारचा प्लॅन काय?
एकीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय फक्त 58 वर्ष आहे. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे झाले पाहिजे अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित केली जात आहे.यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकार देखील याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या तयारीत आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय कधीपर्यंत होणार, सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष कधी होणार हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.