Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हरिपूरमध्ये हॉटेलमधील वेटरचा निर्घृण खूनदोन अल्पवयीन मुले ताब्यात, सांगलीतील गुंडाच्या समावेशाचा संशय

हरिपूरमध्ये हॉटेलमधील वेटरचा निर्घृण खून दोन अल्पवयीन मुले ताब्यात, सांगलीतील गुंडाच्या समावेशाचा संशय
 

सांगली :  सांगली शहराजवळ असलेल्या हरिपूर येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या तरूणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. यातील दोन संशयित अल्पवयीन मुलांना सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या खुनात एका गुंडाचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय असून त्याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

सूरज आलिसाब सिदनाथ (वय २५, रा. हरिपूर रोड, सांगली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आलिसाब लालसाब सिदनाथ (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे. सूरज विवाहीत असून तो दिवसा विटभट्टीवर तर रात्री हरिपूर येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. मंगळवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामासाठी गेला होता. रात्री एकच्या सुमारास एकाने आलिसाब सिदनाथ यांना हरिपूर रस्त्यावरील गुळवणी मठाजवळ सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे फोनवरून सांगितले. 

त्यानंतर आलिसाब घटनास्थळावर गेले. त्यावेळी तेथे सूरज याची दुचाकी (एमएच १० एएन २२३२) पडलेली आढळली तर त्याचा मोबाईलही जवळच पडला होता. सूरजच्या गळ्यावर, डोक्यावर, छातीवर, खांद्यावर, पोटावर, पाठीवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवला. सिदनाथ यांच्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण सराईत गुन्हेगाराचा मुलगा आहे. त्यामुळे त्या गुन्हेगाराचा या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.