महाबळेश्वर : संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे आपले मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी आज महाबळेश्वरला आले होते. मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून विधी पूर्ण होईपर्यंत ते थांबले होते. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बनाजी यांच्या पार्थिवाचा पारशी स्मशानभूमीत दफनविधी झाला. सर्व सोपस्कार उरकूनच राहुल गांधी दुपारी पुण्याला रवाना झाले.
मुंबई येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. बनाजी यांनी २० ते २२ वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्या डोळ्यांवर उपचार केले होते. तेव्हापासून गांधी व बनाजी कुटुंबीयांमध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले होते. ते दोन्ही घरांनी जपले होते. डॉ. बनाजी यांचे चिरंजीव रायन हे राहुल गांधी यांचे मित्र होते. पोतुर्गालची राजधानी लिस्बनमध्ये काही दिवसांपूर्वी जीममध्ये व्यायाम करत असताना रायन यांना हृदयविकाराचा झटका आला.
निधनापूर्वी रायन यांनी आपला अंत्यविधी महाबळेश्वरला व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार डॉ. बनाजी यांनी आपला मुलगा रायन यांचे पार्थिव महाबळेश्वरला शापूर हॉल या बंगल्यावर आणले. सोमवारी दुपारी साडेबाराला रायन यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. आपल्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी यांनी महाबळेश्वरला येण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वरला येण्यासाठी रविवारी रात्री राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन झाले. आज सकाळी पुण्याहून पोलिस बंदोबस्तात राहुल गांधी यांचा महाबळेश्वरचा
प्रवास सुरू झाला. रायन बनाजी यांचे पार्थिव ठेवलेल्या बंगल्यावर सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळी साडेनऊला राहुल गांधी यांचे महाबळेश्वरला आगमन झाले. त्यांनी रायन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व बनाजी कुटुंबीयांचे सांत्वन केले. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत विधी पार पडला. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी व अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी नातेवाइकांची शापूर बंगल्यावर गर्दी झाली होती. शहरातील पारशी समाजबांधव सकाळपासूनच शापूर बंगल्यावर उपस्थित होते.
दुपारी बारा वाजता रायन यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेतून पारशी स्मशानभूमीकडे नेण्यात आले. राहुल गांधी हे स्वतः आपल्या मित्राच्या पार्थिवासोबत त्या रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत गेले. त्या ठिकाणी पारशी समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे रायन यांच्या पार्थिवावर दफनविधी झाला. यानंतर राहुल गांधी हे पुन्हा डॉ. बनाजी यांच्या बंगल्यावर गेले. तेथे पुन्हा त्यांनी बनाजी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना दिलासा दिला. दुपारी तीन वाजता राहुल गांधी हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
कार्यकर्ते भेटीला
संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्याला रवाना होताना शापूर बंगल्याबाहेर आलेल्या काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेतली. जाता जाता त्यांनी हस्तांदोलन केले. काँग्रेसचे नेते विराज शिंदे, सलीम बागवान या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना स्ट्रॉबेरी भेट दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.