अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आज पुन्हा शपथ घेणार आहेत. राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे. सुमारे अडीच वर्षे सत्तेत असतानाही अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर शहरात अद्याप बाळसं धरलेलं नाही.
महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप पक्ष सामोरा गेला नाही. असे असतानाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाने दादांच्या जल्लोषाचे वेगवेगेळ व वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत.महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार आज पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील पक्ष कार्यालयासमोर जल्लोष आयोजित केला आहे.
दुसरीकडे आणखी एक प्रदेश प्रवक्ते असलेले अनिल अहीरकर आणि नागपूर शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी व्होरायटी चौकात दुपारी दोन वाजता जल्लोषाला येण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे कार्यकर्ते विखुरले जाणार असून पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार हे चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटात राष्ट्रवादी काँग्रेस विभाजित झाली होती. अजित पवार यांनी प्रशांत पवार यांना शहराध्यक्ष, तर अनिल अहीरकर यांना प्रदेश कार्याध्यक्ष केले आहे. वर्षभर सर्व पदाधिकारी एकत्र दिसले. आता त्यांच्यात आपसातच पटेनासे झाले आहे. शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात वेगवेगळे कार्यक्रम घेणे सुरू झाले आहे.विधानसभेच्या निवडणुकीत महायुती मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे. पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळात अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समिती वगळता विदर्भातील एकाही पदाधिकाऱ्याला मंडळे व शासकीय समित्यांवर नियुक्त केले नव्हते.नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती. मात्र, शेवटपर्यंत नियुक्ती जाहीर करण्यात आली नाही. सुधार प्रन्यासवरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू होते. आता पुन्हा सत्ता आल्याने अजितदादा कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला आयोगाच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आभा पांडे यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली होती. त्यांना पक्षातून निलंबित केले आहे, त्यामुळे अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधी घेण्यापूर्वीच नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.